European Union vs Donald Trump tariff War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात १८० हून अधिक देशांवर परस्पर आयात शुल्क लावल्याची घोषणा केली. ट्रम्प प्रशासनाने त्वरित हे धोरण लागू केलं. तर या यादीत नसलेल्या इतर सर्व देशांमधून येणाऱ्या आयातीवर १० टक्के आयात शुल्क लादलं आहे. यामध्ये अमेरिकेने चीनवर सर्वाधिक ३४ टक्के आयात शुल्क लावलं आहे. त्याच्या प्रत्युत्तरात चीनने अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क लावत असल्याची घोषणा केली आहे.

चीन अमेरिकेवर केवळ आयात शुल्क लावून थांबला नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर शी जिनपिंग यांच्या सरकारने निर्बंध लावले आहेत. चीनच्या या कृतीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी ५० टक्के आयात शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. तर, चीनही अमेरिकेच्या धमकीने डगमगला नाही. उलट चीन सरकारने शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दुसऱ्या बाजूला युरोपियन महासंघाने अनेक अमेरिकन वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर अद्याप शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. रॉयटर्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. युरोपियन महासंघाने सोमवारी काही अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.

…तर अंडी, हिऱ्यांसह अनेक उत्पादने महागतील

काही दस्तावेजांचा हवाला देत रॉयटर्सने म्हटलं आहे की युरोपियन महासंघ हे २५ टक्के आयात शुल्क येत्या १६ मेपासून लागू करण्याचा विचार करत आहे. इतर काही शुल्क या वर्षाच्या अखेरीस लागू केलं जाईल. यामध्ये हिरे, अंडी, डेंटल फ्लॉस, पोल्ट्री उत्पादनांचा समावेश आहे. दरम्यान, वस्तूंची ही यादी बरीच मोठी होती, मात्र युरोपियन महासंघातील सदस्य राष्ट्रांनी काही वस्तू व उत्पादनांवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत.

युरोपिनय महासंघाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्याऐवजी चर्चेला प्राधान्य

युरोपियन महासंघ सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असला तरी ते चर्चेला प्राथमिकता देतील. प्रत्युत्तरात केल्या जाणाऱ्या कारवाईपेक्षा चर्चेतून मार्ग काढण्यास प्राधान्य दिलं जाईल, असं युरोपियन महासंघाचं मत आहे.