पीटीआय, ब्रसेल्स : रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करत असलेल्या युक्रेनला लढाऊ विमाने आणि अधिक लष्करी साहाय्य पुरवण्यास युरोपीय महासंघाने अनुकूलता दर्शवली आहे. युरोपच्या दौऱ्यावर असलेले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपीय महासंघाच्या संसदेमध्ये भाषण करताना लढाऊ विमानांची मागणी केली तसेच रशिया युरोपची जीवनपद्धती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला. या भाषणाच्या आधी, भाषण सुरू असताना आणि भाषण संपल्यानंतर खासदार त्यांना उभे राहून मानवंदना देत असल्याचे चित्र दिसले.
युरोपीय महासंघाच्या संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मेटसोला यांनी युक्रेनवरील रशियाचा हल्ला हा युक्रेनच्या अस्तित्वासाठीच धोकादायक आहे, अशी टीका करत त्याला प्रतिसादही त्याच पद्धतीने दिला पाहिजे, असे आवाहन केले. युरोपीय महासंघातील सर्व २७ देश या संकटसमयी युक्रेनच्या पाठीशी असल्याची ग्वाही झेलेन्स्की यांना देण्यात आली.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला २४ तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशिया युक्रेनवरील हल्ला अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेलेन्स्की यांनी युरोपला मदत वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांना दोन दिवसांच्या युरोप दौऱ्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात यश मिळाले. ब्रिटनचे रणगाडे पुढील महिन्यात युक्रेनमध्ये पोहोचतील, तसेच युक्रेनच्या लढाऊ वैमानिकांना अद्ययावत प्रशिक्षणही देणार आहे.
युरोपीय महासंघाच्या सदस्यत्वाची मागणी
झेलेन्स्की यांनी युक्रेनला युरोपीय महासंघाचे सदस्यत्व द्यावे, अशी मागणी केली. युक्रेन आणि युरोपीय महासंघामध्ये अनेक गोष्टी समान आहेत, युक्रेनच्या सहभागाशिवाय महासंघ पूर्ण होणार नाही, असा दावा त्यांनी केला. या युद्धात युक्रेनचा विजय होणार आहे आणि तो युरोपीय महासंघाचा सदस्य होणार आहे, असा आत्मविश्वास झेलेन्स्की यांनी बोलून दाखवला.