तैवानच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. एकीकडे चीनकडून सातत्याने तैवानवर हक्क सांगितला जात असताना बळाचा वापर करून तैवान आपल्या अंकित घेण्याची भाषा चीनकडून केली जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून तैवानला पाठिंबा देत उघडपणे चीनविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण बनले असतानाच आता या वादामध्ये युरोपियन युनियननं देखील उडी घेतली आहे. अमेरिकेनं आधीच तैवानला पाठिंबा देत चीनविरोधात उभे ठाकण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियननं देखील तैवानला पाठिंबा देत चीनला एकटं पाडण्याची तयारी सुरू केली आहे.
चीन-तैवान संबंधांमध्ये तणाव
गेल्या काही काळापासून चीन आणि तैवान यांच्यातले संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिथल्या संसदेत बोलताना चीन कधीही तैवानवर हल्ला करण्यासाठी तयार असल्याचा भितीयुक्त इशारा दिला होता. त्यामुळे तैवानसोबतच जागतिक स्तरावर देखील चिंतेचं आणि चीनविरोधी वातावरण तयार होऊ लागलं होतं. चीनकडून देखील सातत्याने तैवान चीनचाच भाग असून त्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले जात आहेत.
अमेरिका आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावर? तैवान प्रश्नावरून जो बायडेन यांनी चीनला दिला स्पष्ट इशारा!
जो बायडेन यांचा चीनला इशारा
दरम्यान, या वादामध्ये नुकतीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उडी घेत तैवानला समर्थन दिलं आहे. तैवान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार कोणत्याही सामरिक संकटात त्यांच्या मदतीसाठी उभं राहाण्यासाठी अमेरिका बांधील असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे चीननं आगपाखड सुरू केली असतानाच आता युरोपियन युनियननं देखील तैवानला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.
“…ही चीनची मोठी चूक ठरली”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ग्लासगोमध्ये सुनावलं!
युरोपियन युनियन म्हणतंय, “आम्ही तुमच्या सोबत”
युरोपियन युनियनचं एक शिष्टमंडळ नुकतंच तैवान दौऱ्यावर येऊन गेलं. या दौऱ्यामध्ये शिष्टमंडळाने “तुम्ही एकटे नाहीत. युरोपियन युनियन आणि तैवान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यायला हवी”, असं स्पष्ट केलं आहे. “आम्ही एक स्पष्ट भूमिका घेऊन इथे आलो आहोत. तुम्ही एकटे नाहीत. युरोपियन युनियन तुमच्यासोबत उभी आहे”, असं युनियनच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केलं आहे.
चीनला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू
गेल्या अनेक वर्षांपासून चीनच्या भितीमुळे तैवान सरकारचा कोणताही प्रतिनिधी युरोपियन युनियनच्या भेटीला गेलेला नाही. मात्र, गेल्या महिन्यात पहिल्यांदाच तैवानचे राष्ट्राध्यक्ष त्सेई इंग-वेन यांनी युरोपचा दौरा केला. त्यामुळे चीनला आव्हान देण्यासाठी तैवाननं देखील हातपाय हलवायला सुरुवात केल्याचं यातून स्पष्ट होत आहे.