एपी, खान युनिस (गाझा पट्टी)
गाझामधील सर्वात मोठे असलेल्या शिफा रुग्णालयातून सर्व रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापितांनी शनिवारी स्थलांतर केले. या रुग्णालयाच्या आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले की, या रुग्णालयात आता फक्त कोणतीही हालचाल करू न शकणाऱ्या रुग्णांसह त्यांची काळजी घेण्यासाठी मोजक्या कर्मचाऱ्यांचे मदत पथक आहे. ते इस्रायली लष्कराच्या नियंत्रणात आहेत.
गाझा शहरात शिफा रुग्णालयातून हे स्थलांतर झाले त्याच दिवशी गाझा पट्टीत इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्ववत झाली. येथील दूरसंचार सपर्क यंत्रणा ठप्प असल्याने संयुक्त राष्ट्रांना तातडीची मानवतावादी मदत वितरण थांबवावी लागली होती. कारण संपर्क यंत्रणेविना येथील मदत पथकांशी समन्वय साधणे अशक्य होते. आता ही संपर्क यंत्रणा पूर्ववत झाली आहे.गाझा शहरात आपल्या आक्रमणाची व्याप्ती वाढवणे इस्रायलने सुरूच ठेवले आहे. इस्रायल लष्कराने समाजमाध्यमांवर अरबी भाषेतून लगतच्या पूर्व आणि उत्तरेकडील निवासी भागांतील रहिवाशांना तसेच जबलियाच्या शहरी निर्वासित शिबिरातील निर्वासितांनी आपल्या सुरक्षेसाठी स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी येथून स्थलांतरित व्हावे यासाठी येथील लष्करी कारवाई तात्पुरती थांबवण्यात आली आहे. या आठवडय़ाच्या प्रारंभी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले होते, की लष्करी तुकडय़ांनी गाझा शहराच्या पश्चिम भागातील लष्करी कारवाई पूर्ण केली आहे.
हेही वाचा >>>गाझा पट्टीमधील निरपराधांच्या मृत्यूंचा पंतप्रधानांकडून निषेध; जागतिक हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन
इस्रायलकडून गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले सुरूच आहेत. इस्रायली हवाई दलाने खान युनिस शहराच्या बाहेरील निवासी इमारतीवर हल्ला केला, ज्यामध्ये किमान २६ पॅलेस्टिनी ठार झाले, असे हे मृतदेह ज्या रुग्णालयात हलवण्यात आले, तेथील डॉक्टरांनी सांगितले. इस्रायलचे लष्कर शिफा रुग्णालयाच्या तळात असलेल्या ‘हमास कमांड सेंटर’चा मागोवा घेत आहे. इस्रायलने केलेल्या आरोपानुसार हा तळ हमास रुग्णालयाच्या तळघरात आहे. मात्र, ‘हमास’ आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कमांड सेंटर येथे नसल्याचे स्पष्ट केले आहे. या रुग्णालयात अजूनही हजारो जणांचे वास्तव्य आहे. त्यांनी हा भाग लवकरच सोडावा, असे आवाहनही लष्कराने केले आहे. शनिवारी इस्रायली लष्कराने सांगितले की रुग्णालयाच्या संचालकांनी रुग्णालय सोडू इच्छिणाऱ्यांना सुरक्षित मार्गाने सोडण्यास मदत करण्यास आवाहन केले होते. लष्कराने हेही स्पष्ट केले, की त्यांनी येथून कोणत्याही स्थलांतराचे आदेश दिले नाहीत आणि ज्या रुग्णांना हलवता येत नाही अशा रुग्णांना मदत करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात राहण्याची परवानगी दिली जात आहे. रुग्णालयातून बाहेर पडलेले लोक कुठे गेले हे लगेच समजू शकले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मोहीम पथकाने दिलेल्या माहितीनुसार गाझामधील २५ रुग्णालये इंधनाच्या कमतरतेमुळे, नुकसान झाल्याने आणि इतर समस्यांमुळे कार्यान्वित नाहीत आणि इतर ११ रुग्णालये केवळ अंशत: काम करत आहेत.
हेही वाचा >>>कला इतिहासकार बी. एन. गोस्वामी यांचे निधन
इस्रायलने केलेल्या दाव्यात नमूद केले, की ‘हमास’च्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी राबवलेल्या जमिनीवरील लष्करी कारवाईचे मुख्य लक्ष्य उत्तर गाझामधील रुग्णालये होती. कारण त्यांचा वापर दहशतवाद्यांचे ‘कमांड सेंटर’ आणि शस्त्रागार म्हणून केला जात होता. मात्र, ‘हमास’ आणि संबंधित रुग्णलयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हा दावा फेटाळला आहे.
रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण-अर्भकांसाठी एक पथक
हमास-नियंत्रित गाझामधील आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते मेधात अब्बास यांनी सांगितले, की इस्रायली लष्कराने हे रुग्णालय तातडीने रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत आणि येथील लोकांना बाहेर काढण्यासाठी रुग्णालयाला तासाभराचा अवधी दिला आहे. हे रुग्णालय बहुतांश रिक्त झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिफा रुग्णालयाचे डॉ. अहमद मोखल्लालती यांनी समाजमाध्यमांवर सांगितले की, रुग्णालयात सुमारे १२० रुग्ण शिल्लक आहेत. जे रुग्णालय सोडण्यास असमर्थ आहेत. त्यात काही अतिदक्षता विभागात दाखल रुग्ण आहेत. तसेच मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकांचाही त्यात समावेश आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी डॉ. मोखल्लालती आणि इतर पाच डॉक्टर रुग्णालयात थांबले आहेत.