एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप येथील न्यायिक अधिकाऱ्यावर करीत, संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई होईपर्यंत न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा बार असोसिएशनने दिला आहे.
अपहरणाच्या एका प्रकरणात साक्ष देण्यासाठी १३ वर्षीय मुलगी सदर न्यायिक अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये २१ जानेवारी रोजी गेली होती. त्या वेळी अधिकाऱ्याने मुलीला खोलीत कोंडून तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप मुलीने केला. या प्रकरणी तिने बार कौन्सिलच्या अध्यक्षांकडे तक्रारही नोंदविली, अशी माहिती बार कौन्सिलचे सचिव दिनेश कुमार पांडे यांनी दिली.
गोंडा विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवनीत राणा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोंडा जिल्हा न्यायाधीशांना परिस्थितीची कल्पना देणारे पत्र पाठवले आहे. तसेच न्यायाधीशांनी याबाबत योग्य ते आदेश द्यावेत असे सुचविले आहे.
न्यायिक अधिकाऱ्यावर आरोप झालेले असल्यामुळे पोलिसांना या प्रकरणी स्वत:हून गुन्हा दाखल करणे शक्य नसून त्यासाठी परवानगी मिळण्याची गरज असल्याचे राणा यांनी सांगितले.
सदर मुलीचे १३ डिसेंबर २०१२ रोजी अपहरण झाले होते, तर १४ जानेवारी रोजी तिची मुक्तता झाली होती. या प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी सदर मुलगी न्यायिक अधिकाऱ्यांकडे गेली होती. या वेळी तिचा विनयभंग करण्यात आला तसेच तिने आत्मसंरक्षणार्थ असलेली धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न करताच, न्यायिक अधिकाऱ्याने तिची एका कोऱ्या कागदावर सही घेतली, असा आरोप पांडे यांनी केला.