बंगळूरुमधील ओमायक्रॉनने बाधित  डॉक्टर  पूर्णपणे बरा झाला. मात्र पुन्हा त्याचा करोना चाचणी अहवाल होकारात्मक आल्याने या ४६ वर्षीय या डॉक्टरला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

देशात ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकातील आहेत. त्यापैकी दक्षिण आफिक्रेतून आलेला एक जण जनुकीय क्रमनिर्धारण होण्याआधीच देशाबाहेर गेला असून त्याच्याविरोधात   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  डॉक्टर असलेल्या दुसऱ्या रुग्णाने काही दिवसांतच ओमायक्रॉनवर मात केली. मात्र  पुन्हा चाचणी करण्यात आल्यानंतर त्याला पुन्हा लागण झाल्याचे दिसून आले आहे. या रुग्णाला विलगीकरणात ठेवले असले तरी त्याच्यात करोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मूळचा गुजराती असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नागरिकावर गुन्हा दाखल केल्याचे बंगळूरु पोलिसांनी सांगितले. ओमायक्रॉन बाधित असलेल्या या रुग्णाची जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करायची होती. मात्र स्थानिक प्रशासनाला  माहिती न देता तो दुबईला गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

 तो ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होता, त्या हॉटेलमधील व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोग्य अधिकाऱ्यांना न कळविता त्याला हॉटेलबाहेर जाऊ दिल्याचा गुन्हा या कर्मचाऱ्यावर नोंदवण्यात आला आहे.

Story img Loader