मागील जवळपास दीड वर्षांपासून रशिया आणि युक्रेन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण जगात चिंतेंचं वातावरण पसरलं होतं. या दोन्ही देशात अजूनही युद्ध सुरू आहे. यामध्ये हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर युक्रेनमधून लाखो जणांचं स्थलांतर झालं आहे. युक्रेनमधील युद्धाची दाहकता कायम असताना परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर स्तुतीसुमनं उधळली.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातील विकसित देशांनी आपल्या नागरिकांना देवाच्या भरोशावर सोडलं होतं. पण नरेंद्र मोदी सरकारने युक्रेनच्या युद्धभूमीतून प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला मायभूमीत परत आणण्यासाठी ९० विमानं पाठवली होती, अशा शब्दांत एस जयशंकर यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. ते वाराणसी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
भारताचं परराष्ट्र धोरण आणि त्याचे वैशिष्ट्ये या विषयावर संवाद साधताना एस जयशंकर म्हणाले, “युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यानंतर जगभरातील विकसित देशांनी युक्रेनमधील आपल्या नागरिकांना देवाच्या भरोशावर सोडलं होतं. आता युद्ध सुरू झालं आहे, आम्ही फक्त इतकीच मदत करू शकतो, असं विकसित देशांनी युद्धभूमीत अडकलेल्या आपल्या नागरिकांना सांगितलं. पण मोदी सरकारने प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला यूद्धभूमीतून बाहेर काढण्यासाठी ९० विमानं पाठवली होती.”