दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करताना जवान अजिबात संकोच करणार नाहीत असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. 70 व्या लष्कर दिनानिमित्त दिल्लीमधील करिअप्पा मैदानात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देण्यात येईल असंही सांगितलं आहे.

‘आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचं खूप नुकसान झालं आहे. मी आपल्या शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचं पाऊल उचलल्यास कारवाई करण्यास आम्ही संकोच करणार नाही’, असं बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. ‘भारताच्या पश्चिम सीमारेषेवर असणारा देश दहशतवादी संघटनांना मदत करत असून भारतीय लष्कर त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देत आहे’, असंही बिपीन रावत यांनी पाकिस्तानचा उल्लेख न करता यावेळी सांगितलं.

यावेळी बिपीन रावत यांनी लष्कर जवानांसाठी एक मोबाइल अॅप लाँच करणार असल्याची माहिती दिली. या अॅपशी लष्कर जवानांचे आधार क्रमांक जोडले जाणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून जवान आपल्या समस्या मांडू शकणार आहेत.

बिपीन रावत यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. आपल्या शत्रू राष्ट्रांकडून जवानांविरोधात सोशल मीडियाचा वापर होत असल्याचं ते म्हणाले आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना जवानांनी काळजी घेतली पाहिजे असं पुन्हा एकदा आवाहन त्यांनी केलं. आपल्या कुटुंबीयांनीही सोशल मीडिया जबाबदारीपणे वापरला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader