Bangladesh crisis : बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेले आंदोलन सत्तांतर करण्यापर्यंत पोहोचले. मात्र या आंदोलनात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. जाळपोळ, तोडफोड यामुळे बांगलादेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केले आहे. आज भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संबोधन करत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.
डीवाय चंद्रचूड म्हणाले, “आपण १९५० मध्ये संविधान स्वीकारले. मात्र शेजारी राष्ट्रात स्वातंत्र्य अनिश्चित होते, त्याचा परिणाम काय झाला? हे आपण बांगलादेशमध्ये पाहू शकतो. याच्यातून स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. स्वातंत्र्याला गृहीत धरणे खूप सोपे असते. परंतु या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे भूतकाळातील प्रसंगावरून ओळखले पाहीजे.”
मागच्या आठवड्यात बांगलादेशात मोठी उलथापालथ झाली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तडकाफडकीने राजीनामा देऊन देश सोडावा लागला. बांगलादेश सोडल्यापासून शेख हसीना भारतात आश्रयाला आहेत. बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. या दरम्यान बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्यांच्या घरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे मोहम्मद युनूस यांनी हा हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले.
दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्वातंत्र्य दिनाबाबत त्यांची भूमिका मांडली. जे या स्वातंत्र्याला सर्वोत्तम बनवण्यासाठीच जगत आहेत आणि जे त्यासाठीच काम करत आहेत अशा व्यक्तींच्या बांधिलकीचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे, असे ते म्हणाले
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड पुढे म्हणाले, कन्नड लेखिका चित्रा श्रीकृष्ण लिखित एक सुंदर लेख वाचत होतो. स्वातंत्र्याचे गाणे (Songs of Freedom) असे या लेखाचे शीर्षक होते. यानंतर डीवाय चंद्रचूड यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या वकीलांचा सन्मान केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, अल्लडी क्रृष्णस्वामी अय्यर, गोविंद वल्लभ पंत, देवी प्रसाद खैतान, सर सय्यद मोहम्मद सदाउल्लाह आणि इतरांना यावेळी मानवंदना वाहण्यात आली.