भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची अखेर आज घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा झटका बसला आहे. तर, या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून मुकुल रॉय यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मुकुल रॉय भाजपाची अंतर्गत माहिती टीएमसीला पुरवत होते, हे सर्वांना ठाऊक होतं” असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी म्हटलं आहे.

मुकुल रॉय यांची घरवापसी!; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह ‘टीएमसी’मध्ये प्रवेश

“मुकुल रॉय हे कधीच जनतेचे नेते नव्हते. पश्चिम बंगालमध्ये एसी रुममधून राजकारण करता येणार नाही. राजकारणातील त्यांचा काळ संपला आहे. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. ते तृणमूल काँग्रेसला भाजपाची अंतर्गत माहिती देतात हे सर्वांना ठाऊक होते. जर, प्रतिस्पर्ध्याला तुमच्या नियोजनाची माहिती समजली तर, ते तुमचे नुकसान करतात.” असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी म्हटले आहे.

“सुविधावादी व्यक्ती जेव्हा राजकारणात असतात, ते अशाप्रकारचंच काम करतात. जेव्हा अभिषेक बॅनर्जींचा तृणमूलमध्ये उदय झाला. तेव्हा अभिषेक बॅनर्जी व मुकुल रॉय यांच्या मोठ्याप्रमाणावर खटके उडत होते. अभिषेक बॅनर्जींनी त्यांना पक्षातून हाकललं होतं. मग ते भाजपात आले, आता परत ते तृणमूलमध्ये गेले आहेत. त्यांचं आयाराम गयारामचं काम आहे, येणंजाणं सुरूच आहे, त्यांना सुविधा जिथं मिळेल तिथं ते राहतील. त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आहे, तेही भाजपाच्या चिन्हावर, त्यांना जायचं होतं तर किमान राजीनामा देऊन तरी जायचं. थोडाफार तरी लोकांचा मनात आदर राहिला असता. आज देखील केंद्रीय सुरक्षा घेऊन फिरत आहेत. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक जिंकले आहेत व तृणमूलमध्ये गेले आहेत.” असं देखील अर्जुन सिंग यांनी बोलून दाखवलं आहे.

तर, तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बसणार मोठा झटका!

मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता. १९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात आहेत.

Story img Loader