गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष ( आप ) सत्तेत येणार, अशी वल्गना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने करत होते. मात्र, ५ जागांवरच ‘आप’ला समाधान मानावे लागलं आहे. जरी सत्ता ‘आप’ला मिळाली नसली, तरी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यातच गुजरात निवडणुकीमधील प्रदर्शनावर केजरीवाल यांनी भाष्य केलं आहे. गुजरातमध्ये ५ जागा जिंकणं तेवढंच अवघड आहे, जेवढं बैलाचं दूध काढणं, असं विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर रविवारी ( १८ डिसेंबर ) दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीवेळी अरविंद केजरीवाल बोलत होते. “एका वर्षात आपण पंजाब, दिल्ली महापालिका निवडणूक जिंकल्या आहेत. गोव्यात २ उमेदवार आणि गुजरातमध्ये १४ टक्के मतं घेत ५ उमेदवार निवडून आले आहेत. गुजरातमधील कामगिरीबद्दल एका व्यक्तीने सांगितलं की, गाईचे दूध कोणीही काढू शकते. पण, आम्ही तर बैलाचं दूध काढलं आहे. २०२७ साली आपला पक्ष गुजरातमध्ये सरकार बनवणार आहे,” अस निर्धार केजरीवाल यांनी केला आहे.
हेही वाचा : “भारतीय सैन्य सीमेवर लढत असताना तुम्ही चिनी अधिकाऱ्यांबरोबर…”, अनुराग ठाकूरांचा राहुल गांधींना सवाल
चीन प्रश्नावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. “चिनी वस्तू कोण खरेदी करत आहे?, भाजपाची चीनकडून वस्तू खरेदी करण्याची गरज काय आहे?, आपण स्वदेशी वस्तूंचे उत्पादन वाढवू शकत नाही का? सरकार भारतीय लोकांना पळवून लावत आहे. तर, चिनी लोकांचा जवळ करत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि उद्योगपती भारत सोडून जात आहे,” असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.