इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातले संबंध प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत हेच आपल्याला बघायला मिळतं आहे. हमासच्य दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी इस्रायलमधल्या विविध भागांमध्ये ५ हजारांहून अधिक ठिकाणी रॉकेट हल्ला केला. यानंतर आता इस्रायलने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ज्यानंतर ज्या बातम्या समोर येत आहेत त्यामुळे माणसाच्या संवेदना कशा चिरडल्या जात आहेत तेच समोर येतं आहे. अशातच इस्रायलची डोळ्यात पाणी आणणारी एक घटना समोर आली आहे. इस्रायलच्या पत्रकार इंडिया नफ्ताली यांनी या घटनेची पोस्ट केली आहे.
काय आहे आहे इस्रायली नागरिकाची पोस्ट?
आपल्या पोस्टमध्ये इस्रायली नागरिक म्हणतो, “माझी बहीण अमित ही फक्त २२ वर्षांची होती. ती पॅरामेडिक्सचं शिक्षण घेत होती. हल्ला झाल्यानंतर तिने जखमी व्यक्ती आणि मृतदेहांसह सहा तास वाट पाहिली. तिला आशा होती की आपली सुटका होईल. त्यानंतर आपल्याकडे एक सुरी तिने बाळगली आणि ती स्वयंपाक घरात लपून बसली होती. युद्धाचे, स्फोटांचे, गोळीबाराचे आवाज माझी बहीण ऐकत होती. माझ्या संपर्कात होती.”
आम्ही इकडे सगळेजण प्रशासनाला विचारत होतो की सेना कुठे आहे? बचाव पथकं कुठे आहेत? मी तिला सातत्याने हे सांगत होतो की तू चिंता करु नकोस तुला मदत नक्की मिळेल. त्यानंतर एक क्षण असा होता की तिने मला मेसेज केला आणि सांगितलं की दहशतवादी क्लिनिकमध्ये शिरले आहेत आणि मला वाटत नाही की मी वाचू शकेन, यातून बाहेर पडू शकेन. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असंही तिने या मेसेजमध्ये लिहिलं होतं असं या पोस्ट लिहिणाऱ्या नागरिकाने म्हटलं आहे. यानंतर पुढे हा नागरिक म्हणतो, काही मिनिटांतच तिने बोलणं थांबवलं आणि फोन बंद केला. जेव्हा मी तिला पुन्हा फोन केला तेव्हा तिने रडत, किंचाळतच मला उत्तर दिलं आणि सांगितलं माझ्या पायावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. इथे असलेल्या सगळ्यांची हत्या करण्यात आली आहे आणि आता मी एकटीच जिवंत उरले आहे. त्यानंतर मी गोळ्यांचा आवाज ऐकला आणि फोन कट झाला. ही पोस्ट इस्रायली पत्रकार इंडिया नफ्ताली यांनी त्यांच्या X (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटानं शनिवारी पहाटे इस्रायल अचानकपणे हल्ला केला. हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. याला इस्रालयनेही चोख प्रत्युत्तर देत गाझा पट्टीत रॉकेट्स हल्ले केले आहेत. यामध्ये इस्रायल आणि हमासमध्ये १००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.