संसदेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षांच्या आघाडीचं नामकरण ‘इंडिया’ करण्यावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसशी जोडलेली प्रत्येक गोष्ट चोरीची आहे, असं मोठं विधानही नरेंद्र मोदींनी यावेळी केलं.
विरोधी पक्षाची समस्या ही आहे की, त्यांना स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी एनडीएचाच आधार घ्यावा लागला आहे. पण सवयीनुसार गर्वाचा ‘आय’ यांना सोडत नाही. त्यामुळे एनडीएमध्ये गर्वाचे दोन ‘आय’ अक्षरं टाकली आहेत. पहिला आय २६ पक्षांचा गर्व आणि दुसरा आय एका कुटुंबाचा गर्व. एनडीएही चोरला आणि इंडियाचेही तुकडे केले, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
विरोधकांचं नामप्रेम आजचं नाही, अनेक दशकांपासूनचं आहे. त्यांना वाटतं नाव बदलून देशावर राज्य करता येईल. गरीबाला चहूबाजूला त्यांचं नाव दिसतं, पण त्यांचं काम कुठेच दिसत नाही. रुग्णालयात नावं त्यांची आहेत, पण उपचार नाहीत. शिक्षण संस्था, रस्ते, उद्याने, योजना, क्रीडा पुरस्कार, विमानतळे, संग्रहालये यांना त्यांची नावं आहेत. पण त्या योजनांमध्ये त्यांनीच हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. समाजाच्या शेवटच्या स्तरावर उभा व्यक्ती काम होताना पाहू इच्छितो. पण त्याला फक्त या कुटुंबाचं नाव मिळालं, असंही मोदी सभागृहात म्हणाले.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसशी जोडलेली कोणतीच गोष्ट त्यांची नाही. निवडणूक चिन्हापासून विचारांपर्यंत सर्वकाही काँग्रेस त्यांचं असल्याचा दावा करतेय. पण ते इतर कुणाकडून तरी घेतलं गेलंय. आपल्या कमतरता झाकण्यासाठी निवडणूक चिन्ह व विचारही चोरले. आता झालेल्या बदलांमध्येही पुन्हा पक्षाचा गर्वच दिसतो. २०१४ पासून ते नकाराच्याच भूमिकेत आहेत. त्यांच्या पक्षाचे संस्थापक ह्यूम हे विदेशी होते. १९२० मध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला नवा ध्वज मिळाला. नवी ऊर्जा मिळाली. पण रातोरात काँग्रेसनं तो ध्वजही हिसकावून घेतला. १९२० पासून हा खेळ चाललाय. मतदारांना भुलवण्यासाठी त्यांनी गांधी नावही चोरून घेतलं.