मंगळाच्या इतिहासात बराच काळ जीवसृष्टीला पोषक असे घटक तेथील पृष्ठभागाच्या खाली अस्तित्वात होते, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. विज्ञान कादंबऱ्यांमध्ये मंगळावरील हिरव्या रंगांच्या माणसांची कल्पना केली होती तसे काही तेथे नव्हते, तरी काही सूक्ष्मजीव मात्र तिथे अस्तित्वात होते.
अबेरदीन विद्यापीठाच्या मदतीने व नॅचरल हिस्टरी म्युझियमच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. डेली मेलने या संशोधनाच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार मंगळाच्या पृष्ठभागाच्या खाली सूक्ष्मजीव अस्तित्वात होते.जेव्हा मंगळाच्या पृष्ठभागावर उल्का आदळत असत तेव्हा तेथील खालच्या भागातले खडक हे आघाताच्या प्रक्रियेमुळे वरच्या बाजूला येत असत. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबायटर व युरोपीय स्पेस एजन्सीच्या ‘मार्स एक्सप्रेस’ या अंतराळयानांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या अंतराळयानांनी तेथील खडकांचे, मातीचे व खनिजांचे विश्लेषण केले होते. तेथील या सर्व घटकांमध्ये पाण्यामुळे बदल झालेले होते हे दिसून आले. पृथ्वीवरही निम्मी जीवसृष्टी ही मातीखालील सूक्ष्मजीवांची आहे, तशीच परिस्थिती मंगळावरही होती. सूक्ष्मजीवांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक तेथे उपलब्ध होते पण तेथे केवळ एकपेशीय सजीवच जगू शकले असावेत, असे मत नॅचरल हिस्टरी म्युझियमचे भूगर्भवैज्ञानिक डॉ. जोसेफ मिशालस्की यांनी व्यक्त केले आहे.
मंगळावरील काही विवरांमध्ये भूजल होते, त्यातून तळी बनली व त्यात माती व काबरेनेट यांचा समावेश होता. ही खनिजे ज्या द्रायूंमुळे बनली त्यांच्या मदतीने मंगळाच्या पृष्ठभागाखालील सूक्ष्मजीवांची माहिती मिळू शकेल. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे नेमके सांगता येत नसले तरी ती भूपृष्ठाखालीच तयार झाली, कारण त्या वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील परिस्थिती प्रतिकूल होती. त्यापासून या सूक्ष्मजीवांचा बचाव भूपृष्ठाखाली असल्यामुळे झाला असावा. पृथ्वीपेक्षाही मंगळावरील भूपृष्ठाच्या थरांचे भूगर्भीय नमुने जास्त चांगल्या प्रकारे सुरक्षित आहेत. त्यामुळे तेथील पृष्ठभागाखालचे थर म्हणजे भूगर्भीय इतिहासाच्या पुस्तकाची पाने आहेत. मंगळावरील खडकांच्या अभ्यासातून आपल्याला बरीच माहिती मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा