Congress MP Karti Chidambaram denies allegations on EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांना या विजयानंतर मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचा कौल नाही. मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी देखील केली आहे. यानंतर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन (EVM) असल्याचे म्हटले आहे. भाजपाला फायदा होईल अशा पद्धतीने ठराविक मतदारसंघात ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आता या दाव्यावर काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघाचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी आपल्याला ईव्हीएमबद्दल कधी वाईट अनुभव आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ईव्हीएमबाबत पक्षातील सहकाऱ्यांनी केलेला दावा आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कार्ती चिदंबरम म्हणाले की, “मी २००४ पासून निवडणुकीत भाग घेतोय, ज्यामध्ये ईव्हीएमचा वापर होत आला आहे. पण मला वैयक्तिकरित्या याबद्दल कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारे फेरफार किंवा छेडछाड झाल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याकडे नाही. जर इतरांनी ईव्हीएमच्या कार्यक्षमतेबद्दल काही शंका असेल, तर ते त्यांचे म्हणणे आहे. परंतु मला वैयक्तिकरित्या ईव्हीएमबद्दल कोणतीही शंका नाही”.

हेही वाचा>> Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

“कारण ईव्हीएमचा वापर होत असताना आम्ही निवडणुकी जिंकल्याही आहेत आणि पराभूत देखील झालो आहोत, त्यामुळे जोपर्यंत कोणी शास्त्रीय आकडेवारी देऊन फेरफार झाल्याचे सिद्ध करत नाही तोपर्यंत मी माझा दृष्टीकोन बदलणार नाही. मला माहिती आहे की माझ्या पक्षातील अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांचे मत वेगळे आहे, पण त्याबद्दल तेच स्पष्टीकरण देऊ शकतात”.

कार्ती चिदंबरम यांनी भारतातील निवडणुकींमधील ईव्हीएम वापराच्या बाजूने मत व्यक्त केल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआघी २०२० मध्येदेखील त्यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ईव्हीएम अचूक असल्याचे म्हटले होते.

चिदंबरम यांनी पोस्ट केली होती की, “ईव्हीएम सीस्टम बळकट, अचूक आणि विश्वासार्ह आहे. हे माझे पूर्वीपासूनचे मत आहे. मी त्यावर ठाम आहे. अनेक राजकीय पक्षांकडून ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत, विशेषत: जेव्हा निकाल त्यांच्या बाजूने लागत नाहीत. आत्तापर्यंत कोणीही त्यांचा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवला नाही”.