Prashant Bhushan on Delhi Election Result: आम आदमी पक्षाचे सहसंस्थापक प्रशांत भूषण एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या खांद्याला खांदा लढताना दिसत होते. मात्र कालांतराने त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असल्याचे सांगताना प्रशांत भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी ‘आप’ला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्ट पक्ष बनविला. केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत, अशीही टीका प्रशांत भूषण यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली विधानसभेचा निकाल लागल्यानंतर प्रशांत भूषण यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, ‘आप’च्या दिल्लीतील पराभवासाठी अरविंद केजरीवाल जबाबदार आहेत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली होती. मात्र पक्षाची कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकतांत्रिक न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला.

प्रशांत भूषण पुढे म्हणाले, “केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. ते प्रवासासाठी आलिशान गाड्या वापरत होते. ‘आप’ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही ‘आप’च्या शेवटाची सुरुवात आहे.”

प्रशांत भूषण यांनी आपल्या पोस्टसह २०१५ साली अरविंद केजरीवाल यांना उद्देशून लिहिलेल्या एका खुल्या पत्राची लिंकही शेअर केली आहे. २०१५ साली पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. स्वच्छ, तत्वनिष्ठ राजकारणाचे स्वप्न दुःखद स्वप्नात बदलू शकते, असा इशारा भूषण यांनी या पत्रातून तेव्हाच केजरीवाल यांना दिला होता.

भाजपाने दिल्लीत तब्बल २७ वर्षांनंतर विजय मिळविला आहे. ७० पैकी ४८ जागा जिंकत भाजपाने बहुमताने सरकार स्थापन केले आहे. तर २०२० मध्ये ६२ जागा जिंकलेल्या आम आदमी पक्षाला यावेळी फक्त २२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान दिल्लीत पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीतील अनेकांनी आप व काँग्रेसने आघाडी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. खुद्द आम आदमी पक्षाचेही नेते आता ही चूक लक्षात आणून देत आहेत. गोव्याचे ‘आप’चे प्रमुख अमित पालेकर यांनी सांगितले की, “काही मतदारसंघात पराभवाचा फरक लक्षात घेता दोन्ही पक्ष त्यामध्ये काँग्रेस आणि ‘आप’ जर एकत्र लढले असते तर फायदा झाला असता. पण या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी आणि इतर घटकही महत्वाचे होते. तसेच या निवडणुकीत आम्ही काही गोष्टींना कमी लेखले गेले. खरेतर दिल्लीचा निकाल हा आमच्यासाठी अनपेक्षित आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex aide of arvind kejriwal prashant bhushan criticize says beginning of the end of aap kvg