आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी भल्या पहाटे अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री उशीरा त्यांना अटक वॉरंट देण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूंनीही अशा प्रकारे आपल्याला अटक केली जाण्याला विरोध केला. मात्र, अखेर सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून आता वैद्यकीय तपासणीनंतर चंद्राबाबू नायडूंची रवानगी तुरुंगात होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं?
चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशच्या नंदयाल शहरात एका सभेसाठी शुक्रवारी संध्याकाळी उपस्थित होते. रात्री सभा संपवून ते आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले असताना त्यांना सीआयडीनं त्यांचं अटक वॉरंट सोपवलं. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूही संतप्त झाले. आपण एक माजी मुख्यमंत्री आहोत, आपल्याला एनएसजीचं संरक्षणही आहे. अशा प्रकारे ही अटकेची कारवाई कशी होऊ शकते? असा जाब विचारताना ते व्हिडीओमध्ये दिसले.
मात्र, अखेर चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीनं शनिवारी भल्या पहाटे अटक केली. त्यांना घेऊन जाताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीसमोर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी त्यांना हटवून चंद्राबाबू नायडू यांना तिथून वैद्यकीय तपासणीसाठी नेलं.
कौशल्यविकास प्रकरणात अटक
चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीनं कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. २०२१ साली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २५० कोटींच्या घरात या घोटाळ्याचा आकडा असून चंद्राबाबू नायडू या प्रकरणात आरोपी क्रमांक एक आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं ही अजामीनपात्र असल्यामुळे यावरून आंध्र प्रदेशात राजकीय वादंग सुरू होण्याची शक्यता आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी स्वत:च काही दिवसांपूर्वी आपल्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, असं विधान केलं होतं.