राजधानीतील सामूहिक बलात्कार, भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवर झालेल्या आंदोलनांत सहभागी झाल्यानंतर माजी लष्करप्रमुख जन.व्ही.के.सिंग यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय सरकारने बुधवारी घेतला.
जन.सिंग यांना ‘झेड प्लस’ व्यवस्था सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र यासंदर्भात घेण्यात आलेल्या आढाव्यानंतर सिंग यांना आता संरक्षणाची आवश्यकता नसल्याचा निष्कर्ष गृह मंत्रालयाने काढला, असे संरक्षण  मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराच्या मुख्यालयास हा निर्णय कळविण्यात आल्यानंतर सिंग यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले ३० ते ३५ अधिकारी, ‘बुलेट प्रूफ’ मोटार काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सिंग हे ३१ मे रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांना ३० नोव्हेंबपर्यंत ‘झेड प्लस’ सुरक्षा कवच पुरविण्यात आले होते. याखेरीज, दिल्लीतील कॅण्टोनमेण्ट परिसरात त्यांना एक वर्ष राहण्याची अनुमती देण्यात आली होती.
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध नोंदविण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी सिंग यांच्याविरोधात प्राथमिक आरोपपत्र दाखल केले आहे. निवृत्त झाल्यानंतर सिंग यांनी लगेचच सरकारविरोधात अनेक मुद्दय़ांवर तोफा डागल्या होत्या. तसेच नोव्हेंबर महिन्यात त्यांनी संसद बरखास्तीचे आवाहन करून उत्तराखंड व उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ संसदेस घेराव घालण्याचेही आवाहन केले होते.

Story img Loader