गोमांस सेवन केल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत दादरी येथे ५० वर्षीय मोहम्मद अखलाख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे गेल्या तीन दिवसांपासून पडसाद उमटत आहेत. मात्र अखलाख यांच्या घरात गोमांस आढळले असेल तर ते दोषी आहेत, असे उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांनी सूचित केले आहे. ज्या ग्रामस्थांनी अखलाख यांना मारहाण केली त्यांच्यावर खुनाचा नव्हे तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला पाहिजे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बिसरा गावात महापंचायत आयोजित करण्याचा इशाराही भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.

मोहम्मद अखलाख यांचा मृत्यू मारहाणीमुळे झालेला नाही तर आपला मुलगा मरण पावला असल्याची चुकीची माहिती त्यांना कोणीतरी दिली आणि त्या धक्क्य़ाने त्यांचा मृत्यू झाला. हे नेहमीच घडत असते. हिंदू समाज गायीची पूजा करतो. जर गोवंश हत्या पाहिली तर कोणाचे रक्त उसळणार नाही, असा सवाल भाजपच्या उत्तर प्रदेश पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष श्रीचंद शर्मा यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’कडे केला.

दादरीचे भाजपचे माजी आमदार नवाबसिंह नागर यांनी सांगितले की, गोवंश हत्या करण्यात आल्याचे आणि गोमांस सेवन केल्याचे सिद्ध झाल्यास अखलाख आणि त्याचे कुटुंबीय दोषी आहेत.  ही घटना नियोजित नव्हती, जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, त्याची प्रतिक्रिया उमटते आणि त्यानंतर असे प्रसंग घडतात, असे नागर यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. भाजप आणि बसपाच्या नेत्यांनी गावाला भेट देऊन अखलाखच्या कुटुंबीयांची आणि सहा आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपच्या नेत्यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे पाच मागण्या केल्या आहेत. गावात भीतीचे वातावरण आहे, जनतेला अटकेची भीती वाटत आहे, त्यामुळे प्रशासनाची ही वर्तणूक थांबली पाहिजे, असेही ते म्हणाले.

अखलाख यांच्या घरातून गोळा करण्यात आलेले मांसाचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आमच्या घरातील शीतकपाटात मांस होते, गोमांस नव्हते, असे अखलाखची मुलगी साजिदा हिने सांगितले.

Story img Loader