माजी गृहसचिव आर. के. सिंह हे आता भाजपमध्ये आहेत. ते त्या पक्षाची भाषा बोलत असल्याने त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणार नाही अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे.
सिंह यांनी सेवानिवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सातत्याने त्यांनी शिंदे यांच्यावर आरोपांचे सत्र सुरू केले आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, हे आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत, ते माजी गृहसचिव या नात्याने नाहीत असा टोला त्यांनी सिंह यांना लगावला.
शिंदे यांनी दिल्ली पोलिसांच्या नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा, तसेच दाऊद इब्राहिमला अमेरिकेच्या सहकार्याने भारतात आणण्याप्रकरणी चुकीची माहिती दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी योग्य नाहीत, त्यांच्यापेक्षा शंभर पटीने चिदंबरम चांगले आहेत असे मत सिंह यांनी नोंदवले होते.
डिसेंबरमध्ये सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, आता ते बिहारमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्यावरील आरोपांना काँग्रेस पक्षातून यापूर्वीच उत्तर देण्यात आले आहे. सिंह संधीसाधू असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली होती. तर सिंह यापूर्वीच का बोलले नाहीत असा सवाल माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी विचारला होता.
कर्मचारी परत बोलावले
सेवानिवृत्त झाल्यावरही आपल्याकडे सेवेत ठेवलेल्य १२ कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात आले आहे. आर. के. सिंह यांच्या सुरक्षेत असलेले विविध दलांचे हे जवान आहेत. मात्र माजी गृहसचिव या नात्याने सिंह यांना दिल्ली पोलिसांची सुरक्षा मिळेल. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला वैयक्तिकरीत्या कर्मचाऱ्यांना ठेवण्याची परवानगी नाही.
दाऊद समर्थकावर सुशीलकुमार शिंदेंची कृपा; आर.के.सिंग यांचा खळबळजनक आरोप