गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळत आहे. यामुळे मणिपूरमधलं सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. सामाजिक असंतोषाच्या या घटनांचे पडसाद देशभरात उमटत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत गंभीर शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील वेगळ्याच बाजूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न माजी लष्करप्रमुखांनी केल्याचं बोललं जात आहे.
मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
३ मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांना खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ऑल ट्रायबल स्टुडेंट्स युनियन ऑफ मणिपूरनं ३ मे रोजी एक मोर्चा काढला होता. मैतेई समाजाला अनुसूचित जमातींच्या यादीत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला त्यांचा विरोध होता. मात्र, या मोर्चानंतर मणिपूरमध्ये सामाजित संघर्ष निर्माण झाला. मोर्चाच्या दुसऱ्याच दिवशी मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्याची संतापजनक घटना घडली. मात्र, या घटनेचा व्हिडीओ दोन आठवड्यांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर त्यावरून देशभर संतापाची लाट उसळली.
“…पण मोदी अजून झोपेत आहेत”, भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया; पक्षाचा दिला राजीनामा!
काय म्हणाले माजी लष्करप्रमुख?
दिल्लीच्या इंडियन इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षितता दृष्टीकोन या संवादानंतर त्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. “सध्या अधिकारपदावर बसलेले आणि या सर्व घडामोडींमध्ये निर्णय घेणारे त्यांच्या परीने सर्वोत्तम काम करत आहेत असा मला विश्वास आहे”, असं मनोज नरवणे यावेळी म्हणाले.
परकीय शक्तींचा हात?
दरम्यान, यावेळी बोलताना मणिपूरमधील हिंसाचारात परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मनोज नरवणे म्हणाले आहेत. “या सगळ्या घटनांमध्ये परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मी तर असं म्हणेन की त्यांचा तिथे वावर आहेच. विशेषत: चीन गेल्या अनेक वर्षांपासून कट्टर गटांना मदतीचा हात देत आले आहेत”, असं मनोज नरवणे यावेळी म्हणाले.
“काहींना मणिपूरमध्ये हिंसाचार हवा आहे”
“अशा काही संघटना किंवा शक्ती असू शकतात, ज्यांना मणिपूरमधील हिंसाचारातून फायदा होणार आहे. त्यांना मणिपूरमधील परिस्थिती सामान्य होऊ नये असंच वाटतंय. तिथे जेवढी अशांतता असेल, तेवढा त्यांचा फायदा होईल. त्यामुळेच कदाचित एवढे प्रयत्न करूनही मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाहीये”, असं नरवणे यांनी यावेळी नमूद केलं.