इशरत जहाँ चकमकप्रकरणात आरोपी असलेले गुजरातचे निवृत्त आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांचे शुक्रवारी मोठ्या धुमधडाक्यात अहमदाबादमध्ये स्वागत करण्यात आले. २००७ मध्ये या प्रकरणात आरोप ठेवण्यात आल्यानंतर नऊ वर्षांनी पहिल्यांदाच वंजारा गुजरातमध्ये आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेकजण अहमदाबाद विमानतळावर उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने वंजारा यांना दिलेल्या जामीनाच्या अटींमध्ये सुधारणा करून त्यांना त्यांच्या राज्यामध्ये परतण्याची मुभा दिली. त्या पार्श्वभूमीवर वंजारा गुजरातमध्ये परतले. तेथून ते थेट गांधीनगरला रवाना झाले. तेथील एका सभागृहात त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते. अनेक लोकांनी नाचून, ढोल वाजवून, वंजारा यांच्यावर फुले उधळून त्यांचे स्वागत केली. यावेळी वंजारा यांना एक तलवारही भेट देण्यात आली. ती हातात घेत वंजारा यांनीही उपस्थितांसोबत ताल धरला. यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी भारतमाता की जय असे लिहिलेले टी-शर्ट घातले होते. यावेळी सभागृहाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा