पीटीआय, बंगळूरु : भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. सावदी यांनी दावा केलेल्या अथनी मतदारसंघात भाजपने काँग्रेसमधून पक्षात आलेल्या विद्यमान आमदाराला उमेदवारी दिल्याने सावदी हे नाराज होते. तिकीटवाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असून किमान २० मतदारसंघांत पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी विधानसभेसाठी भाजपने १८ विद्यमान आमदारांसह दोन विधान परिषद आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्याच वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी हे विधान परिषदेचे सदस्य होते, त्यांनी बेळगावीमधील अथानी या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून विद्यमान आमदार महेश कुमथल्ली यांना उमेदवारी दिली. कुमथल्ली हे २०१८ साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पक्षाने डावलल्याने नाराज झालेल्या सावदी यांनी गुरुवारीच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी शुक्रवारी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेता सिद्दरामय्या यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सावदी यांच्या पक्षांतरावर दु:ख व्यक्त केले. मात्र, ‘नेते गेले तरी कार्यकर्ते भाजपसोबतच राहतील’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बंडखोरीचे प्रमाण जास्त

कर्नाटकमध्ये भाजपला प्रथमच मोठय़ा प्रमाणात बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. उमेदवारी न मिळाल्याने तीन आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यांसह अनेक माजी आमदारही तिकीट न मिळाल्याने बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. मात्र, या नेत्यांची समजूत काढण्यात येईल, असे भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex karnataka deputy chief minister in congress party aspirants candidates ysh
Show comments