Murder of Rretired Karnataka DGP Om Prakash : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश (६८) यांची राहत्या घरी हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ही घटना रविवारची असून बंगळुरूतील त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान या प्रकरणात दररोज नवीन खुलासे केले जात असून या घटनेबाबात पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी ओम प्रकाश यांनी दुपारी ऑनलाईन फिश फ्राय ऑर्डर केले होते. ताटात दोन मासे आणि भात घेऊन दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. प्रकाश यांनी त्यांच्या ताटातील एक मासा आणि अर्धा भात संपवला होता , तेव्हा त्यांची पत्नी पल्लवी (६४) यांनी त्यांच्या चेहर्‍यावर मिरचीची पूड टाकली आणि चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांनी ओम प्रकाश यांच्या गळ्यावर वार केले आणि नंतर तेलाची बाटली मारली, अशी माहिती पल्लवी यांनी दिलेला जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या हवाल्याने पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान प्रकाश यांच्या हत्येनंतर २४ तासांनी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली पल्लवी यांना अटक केली आहे.

शरिरवार अनेक वेळा वार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे प्राण सोडण्यापूर्वी १५ मिनिटांहून अधिक काळ जमिनीवर पडून राहिले असा संशय आहे. तसेच त्यांच्या मृतदेहाजवळ दोन बाटल्या सापडल्या होत्या ज्यापैकी एक टॉयलेट क्लीनरची आणि दुसरी फ्लोअर क्लीनरची होती. पल्लवी यांनी हल्ला केल्यानंतर प्रकाश यांनी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पत्नीने त्यांच्या चेहऱ्यावर चादर टाकली आणि त्यांना जमिनीवर पाडल्याचे सांगितले जात आहे. पल्लवी यांनी प्रकाश हे गयावया करत असताना त्यांना गळा, खांदा, पोट आणि पाठीवर अनेक वेळा भोसकलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पल्लवी प्रकाशच्या शेजारी उभी होती, जे डोके ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत होते. तसेच त्यांनी लुंगी, बनियन आणि चप्पल घातली होती. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याची लुंगी आणि बनियन रक्ताने माखलेले होते

हत्येच्या वेळी या जोडप्याची मुलगी कृती ही त्याच मजल्यावर उपस्थित असल्याचा संशय आहे, परंतु अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. जेव्हा आमचे पथक घटनास्थळी पोहचले तेव्हा ती तिसऱ्या मजल्यावरील तिच्या घरात होती असे अधिकाऱ्याने सांगितले.

हत्येनंतर पत्नीचा मैत्रिणीला व्हिडीओ कॉल

“प्रकाश यांच्या हत्येनंतर पल्लवी यांनी निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या त्यांच्या मैत्रिणीला तिच्या तिने राक्षसाला मारल्याचा मेसेज केले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पल्लवीने निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला आणि प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दाखवले.

पल्लवी यांनी इतर दोघांनाही फोन करून घटनेची माहिती दिली. त्यापैकी एकाने पोलिस हेल्पलाइन ११२ ला कळवले. पण होयसळा पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी, पल्लवीने स्वतः एचएसआर लेआउट पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी तिला अटक केल्यानंतर, निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला काही माहिती देण्यासाठी एचएसआर लेआउट पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. डीसीपी (दक्षिण-पूर्व) सारा फातिमा यांनी अधिकार्‍याच्या पत्नीशी बोलले, परंतु तिचा जबाब नोंदवण्यात आला नाही, असे सूत्रांनी सांगितले.