गुरुग्राममधील हॉटेलमध्ये एका मॉडेलची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या मॉडेलचे नाव दिव्या पहुजा असल्याचे सांगितले जाते. हत्या करण्यात तीन आरोपींचा समावेश असून त्यापैकी एक सीटी पॉईंट हॉटेलचा मालक अभिजीत सिंह असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच हॉटेलमध्ये दिव्याची हत्या झाली. हॉटेल मालक अभिजीतने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दिव्याची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी १० लाख रुपये दिले, असेही सांगितले जाते.
हॉटेलबाहेर असलेल्या एका निळ्या बीएमडब्लू गाडीतून दिव्याचा मृतदेह बाहेर नेल्याचे सीसीटीव्ही चित्रण हस्तगत करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी दिव्यासह अभिजीत आणि त्याचे साथीदार हॉटेलमधील खोली क्र. १११ मध्ये आल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर त्याच रात्री अभिजीत आणि त्याचे साथीदार दिव्याचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून बाहेर नेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली.
हे वाचा >> लहान मुलांनी फुलं तोडली म्हणून मालकाने अंगणवाडी सेविकेला दिली शिक्षा, किळसवाणे कृत्य
गुरुग्राम पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक तयार केले असून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी त्यांना पंजाब आणि इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहे. दिव्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिजीत आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दिव्या पहुजा ही गँगस्टर संदीप गडोली याच्या २०१६ साली झालेल्या चकमकीप्रकरणी प्रमुख संशयीत होती. दिव्याच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारीमध्ये तिच्या हत्येबद्दल गँगस्टर संदीप गडोलीची बहिण आणि त्याच्या भावाला जबाबदार धरले आहे. या दोघांनी अभिजीतस मिळून दिव्याला ठार केले असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
मुंबईमध्ये २०१६ साली गँगस्टर संदिप गडोलीचा चकमकीत मृत्यू झाला होता. दिव्या तेव्हा गडोलीची प्रेयसी असल्याचे सांगितले गेले होते. गडोलीच्या हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांनी तिला अटकही केले होते. मागच्यावर्षी जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता.
दिव्या, तिची आई आणि पाच पोलिसांना गडोलीच्या खोट्या चकमकीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी गडोलीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये हत्या झाली होती. त्यानंतर जवळपास सात वर्ष दिव्याने कारावास भोगला.