पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्यासमोरील अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. ईश्वरनिंदा केल्याच्या कारणातून इम्रान खान यांच्यासह माजी गृहमंत्री शेख रशीद आणि इम्रान खानचे चीफ ऑफ स्टाफ शाहबाज गिल यांच्याविरोधात फैसलाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गुरुवारी सौदी अरेबियातील मदिना या मुस्लिमांच्या पवित्र स्थळाला भेट दिली होती. यावेळी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या काही समर्थकांनी शरीफ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. समर्थकांनी “चोर-चोर” आणि “गद्दार” अशी घोषणाबाजी केली आहे. मदिना सारख्या मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र स्थानी अशाप्रकारे घोषणाबाजी करणं मोठा गुन्हा मानला जातो. त्यानुसार फैसलाबाद याठिकाणी इम्रान खान यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात ‘ईश्वरनिंदे’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदिना येथे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि त्यांच्या शिष्टमंडळाविरुद्ध घोषणाबाजी केल्याप्रकरणी इम्रान खान यांना लवकरच अटक केली जाईल, असं आश्वासन पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी दिलं आहे. दुसरीकडे, मदिनामध्ये घोषणाबाजी करणाऱ्या पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्याचा दावा मदिना पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, शनिवारी एका टीव्ही मुलाखतीत इम्रान खानने घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांपासून स्वत:ला अलिप्त केलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, “मदिना सारख्या पवित्रस्थानी कोणालाही घोषणाबाजी करण्यास सांगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही.” संबंधित घोषणाबाजी केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून त्यामध्ये “चोर-चोर” आणि “गद्दार” अशा घोषणा दिल्याचं ऐकू येत आहे.

Story img Loader