संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या कामगिरीचा उल्लेख करत भाषण केलं. त्यानंतर मात्र देशाचे माजी पंतप्रधान व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी व्यक्त केलेल्या भावनांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.
“…हे काँग्रेसला सहन होईल का?”
“मी या सभागृहात येण्यासाठीही तयार नव्हते. काँग्रेसमधूनच माझा पराभव करण्यासाठी दुसरा उमेदवार उभा करण्याची तयारी केली होती. तेव्हा खर्गेंनी ठामपणे सांगितलं होतं की जर देवेगौडांचा पराभव होणार असेल, तर मी उमेदवारी मागे घेतो. मला खर्गेंना विचारायचंय, की तुम्हाला जर या देशाच्या पंतप्रधानपदी यायचं असेल, तर काँग्रेसला हे सहन होईल का? मला माहिती आहे की काँग्रेस काय आहे”, अशा शब्दांत देवेगौडांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
“खर्गेजी तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहात. ३५ ते ४० वर्षं तुम्ही राजकीय क्षेत्रात काम केलं आहे. पण जेव्हा कुणीतरी तुमचं नाव पंतप्रधानपदासाठी किंवा इंडिया आघाडीच्या नेतेपदासाठी सुचवलं, तेव्हा तुमच्याच मित्रांकडून त्याला विरोध करण्यात आला होता”, असंही देवेगौडांनी नमूद केलं.
कुमारस्वामींचा केला उल्लेख
दरम्यान, यावेळी देवेगौडांनी त्यांचे पुत्र व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा उल्लेख केला. “मागे माझी इच्छा होती की खर्गेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसावं. पण तेव्हा काँग्रेसच्या हाय कमांडनं निर्णय घेतला की कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील. खर्गे इथेच आहेत. त्यांनी सांगावं. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, तेव्हा १३ महिन्यांत त्यांना हटवण्यात आलं. कुणी त्यांना हटवलं? खर्गेंनी त्यांना हटवलं नाही, काँग्रेस नेतृत्वानं हटवलं. त्यामुळे खर्गे सर्वोच्च पदावर आल्याचं काँग्रेसला सहन होणार नाही. आंध्र प्रदेशमध्ये काय झालं ते मला माहिती आहे. मी असंख्य उदाहरणं देऊ शकतो”, असा दावाही देवेगौडा यांनी केला.
भाजपाला पाठिंबा का दिला?
दरम्यान, काँग्रेसला माझा पक्ष उद्ध्वस्त करायचा होता, म्हणून मी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असा दावा देवेगौडा यांनी केला. “मी भाजपासोबत वैयक्तिक लाभासाठी गेलेलो नाही. मी पंतप्रधानांच्या चेंबरमध्ये गेलो, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी दाखवलेलं प्रेम आणि आपुलकी ही एकच गोष्ट मला विद्यमान पंतप्रधानांकडून मिळाली आहे. इतर काहीही नाही. माझ्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून हटवलं, तेव्हा मी त्याला सांगितलं की तू भाजपाबरोबर जा काँग्रेस तुला मोठं होऊ देणार नाही”, असंही देवेगौडा म्हणाले.
“त्या दिवशी मनमोहन सिंग रडले”
“एकदा मनमोहन सिंग काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या चुकांसाठी रडले होते. त्या दिवशी काय झालं हे मला माहिती आहे. या देशाचं पंतप्रधानपद सांभाळणारा व्यक्ती त्या दिवशी रडला. ज्या व्यक्तीनं या देशाला कर्जबाजारीपणाच्या गर्तेतून वाचवलं, प्रामाणिकपणे देशाची सेवा केली, ते मनमोहन सिंग जेव्हा लोकसभेत टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर चर्चा झाली तेव्हा रडले. मला खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत. पण मी इथे सगळे मुद्दे मांडणार नाही. या सभापतीपदी बसलेले अनेक नेते रडले आहेत. मी त्यांची नावंही सांगू शकतो”, असंही देवेगौडा यांनी सांगितलं.