माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर आठवडाभरात पाकिस्तानात परतण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. देशातील कायद्याच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी पाच वर्षांपासून परदेशात आश्रयाला गेलेले मुशर्रफ सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत.
देशात हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतर आठवडाभरातच मी मायदेशी येईन, असे मुशर्रफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘माझ्या देशासाठी माझे मन जळते. मला पाकिस्तानात जाऊन शत्रू जमवायचे नाहीत. ही वेळ मनोमीलनाची आहे. माझे माझ्या देशावर प्रेम आहे, म्हणूनच मी परत येतो आहे,’ असे ते म्हणाले.
भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार आल्यानंतर २००८मध्ये मुशर्रफ यांनी मायदेशातून पलायन केले होते. तेथूनच २०१०मध्ये त्यांनी ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाची स्थापनाही केली. २०११पासूनच अनेकदा त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता तरी ते मायदेशी जाणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.