संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन
‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ योजनेच्या औपचारिक अधिसूचनेबाबत आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी असमाधान व्यक्त केल्याच्या संदर्भात, ‘सर्वच मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत’, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करताना मंगळवारपासून आपली पदके परत करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
सैनिकांच्या ‘बहुतांश’ मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत यावर भर देऊन, या संदर्भात स्थापन केले जाणार असलेला न्यायिक आयोग सर्व ‘समस्यांकडे’ लक्ष देईल, असे पर्रिकर म्हणाले. लोकशाहीत प्रत्येकालाच मागणी करण्याचा हक्क आहे. एकाच पदासाठी सारखे निवृत्तीवेतन ही त्यांची मुख्य मागणी मान्य करण्यात आली असून, इतर गोष्टी आम्ही ५ सप्टेंबरला जाहीर केल्यानुसार आहेत. स्वेच्छानिवृत्तीवेतनाबाबतचा (व्हीआरएस) संभ्रमही आम्ही दूर केला आहे, असे पर्रिकर एका कार्यक्रमानंतर म्हणाले.
सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या अधिसूचनेबाबत माजी सैनिक नाराज आहेत याचा उल्लेख केला असता पर्रिकर म्हणाले की, ‘मूलभूत महत्त्वाचे मुद्दे’ सोडवण्यात आले आहेत आणि तरीही काही अडचण असेल, तर न्यायिक आयोग त्याकडे लक्ष देईल.
दरम्यान, सरकारने एक पद- एक निवृत्तीवेतनाच्या मुद्याबाबत निर्देश दिले असून प्रत्येकाने ते मान्य करायला हवेत, असे मत वायुदलप्रमुख अरुप राहा यांनी व्यक्त केले. याउपरही काही त्रुटी राहिल्या असतील, तर योग्य वेळी त्या दूर केल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले.
दरम्यान, संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर आंदोलनकर्त्यां माजी सैनिकांनी टीका केली आहे. ‘एक पद- एक निवृत्तीवेतन’ ही आमची एकच मागणी असून, सरकारने हा मुद्दा जटिल करणाऱ्या काही तरतुदी अधिसूचनेत जोडल्या आहेत. आम्हाला ही योजना तिच्या व्याख्येनुसार हवी आहे. कुठल्याही कनिष्ठ सैनिकाला त्याच्या वरिष्ठापेक्षा जास्त निवृत्तीवेतन मिळायला नको, यावर सैनिकांनी भर दिला.
सरकारच्या अधिसूचनेच्या विरोधात आम्ही उद्यापासून आमची पदके परत करणे सुरू करणार आहोत. १०-११ नोव्हेंबरला देशभरातील माजी सैनिक त्यांची पदके परत करण्यास सुरुवात करतील. त्यांनी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांना याबाबत आधीच कळवले आहे, असे इंडियन एक्स-सव्र्हिसमेन मूव्हमेंटचे (आयईएसएम) सरचिटणीस व निवृत्त ग्रूप कॅप्टन व्ही.के. गांधी यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलबाहेर सैनिक पदके परत करतील. गर्दीच्या ठिकाणांची निवड करण्याचा उद्देश, सामान्य माणसाला या मुद्याबाबत माहिती देणे हा असल्याचे गांधी म्हणाले.