शिक्षिकेने तीन दशकांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. ३७ वर्षीय आरोपीने या हत्येची कबुली दिली आहे. २०२० मध्ये या व्यक्तीने प्राथमिक शाळेत आपली शिक्षिका राहिलेल्या महिलेची हत्या केली होती. बेल्जियममध्ये ही घटना घडली असून गुरुवारी सरकारी वकिलांनी याची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Gunter Uwents असं या आरोपीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका मारिया व्हर्लिंडेन यांनी १९९० मध्ये आपल्यावर केलेली कमेंट विसरु शकलो नव्हतो. त्यावेळी आपण फक्त सात वर्षांचे होतो.

२०२० मध्ये ५९ वर्षीय मारिया यांची त्यांच्या घऱात हत्या झाली होती. बेल्जियम पोलिसांनी हजारो लोकांचे डीएनए नमुने घेत तपास केल्यानंतरही हत्येचा उलगडा होत नव्हता. मारिया यांच्या पतीने लोकांना साक्षीदार असल्याच पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. पण काही केल्या हल्लेखोराचा शोध लागत नव्हता.

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, १०१ वेळा भोसकून मारिया यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पाकिटात असणाऱ्या पैशांना हात लावला नसल्याने चोरीच्या उद्धेशाने हत्या झाली नसल्याचं स्पष्ट होतं.

हत्येच्या १६ महिन्यांनी २० नोव्हेंबरला आरोपीने आपल्या मित्राला हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. अखेर रविवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या डीएनए नमुन्यांची आणि आरोपीच्या नमुन्यांची तपासणी केली आहे.

आरोपीने हत्येची कबुली दिली असून सविस्तर माहिती सांगितल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे. प्राथमिक शाळेत असताना शिक्षिकेमुळे आपल्याला खूप सहन करावं लागलं असं त्याचं म्हणणं आहे. तपासादरम्यान याची चाचपणी केली जाईल असं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं. यानंतर त्याला कस्टडीत पाठवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex student stabs teacher 101 times 30 years after humiliation at belgium school sgy