सीबीआयची न्यायालयात माहिती
जिंदाल उद्योगसमूहाच्या दोन फम्र्सना झारखंडमधील कोळसा खाणीचा पट्टा देण्यात यावा यासाठी उद्योगपती नवीन जिंदाल, माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता यांनी इतरांच्या सोबतीने कट केला, अशी माहिती सीबीआयने सोमवारी विशेष न्यायालयाला दिली.
जिंदाल स्टील अँड पॉवर लि. (जेएसपीएल) आणि गगन स्पाँज आयर्न प्रा. लि. (जीएसपीआयएल) या कंपन्यांना अमरकोंडा मुरगदंगल कोळसा खाण पट्टे मिळावेत म्हणून जिंदाल उद्योगसमूहाच्या बाबतीत पक्षपात करण्यासाठी झारखंड सरकारच्या संपूर्ण यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला, असे सीबीआयने सांगितले.
झारखंडमधील अमरकोंडा मुरगदंगल कोळसा खाणीचा पट्टा वरील दोन कंपन्यांना देण्यात झालेल्या कथित अनियमिततांशी संबंधित प्रकरणांत सीबीआयने जिंदाल, राव, कोडा, गुप्ता व इतर ११ जणांविरुद्ध विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
नवीन जिंदाल व राव यांच्या वतीने युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी मात्र सीबीआयच्या या दाव्याला विरोध केला. आपल्या अशिलांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

Story img Loader