महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पोलंडचे सत्ताधारी पक्षाचे नेते जारास्ल्हव काझीन्स्की यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. “महिला जास्त प्रमाणात दारू पित असल्यानं देशात जन्मदर घसरला आहे “, असं वादग्रस्त विधान काझीन्स्की यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर पोलंडमधील जनतेकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
महिलांविषयी त्यांची ही टीपण्णी निर्थरक आणि पितृसत्ताक असल्याचा हल्लाबोल पोलंडमधील राजकीय नेते, सेलिब्रेटींनी केला आहे. “वयाच्या पंचविशीपर्यंत स्त्रिया त्यांच्या वयाच्या पुरुषांपेक्षा जास्त दारू पितात, अशी परिस्थिती आहे. यामुळे मुलं होत नाही”, असं अजब वक्तव्य काझीन्स्की यांनी केल्याचं वृत्त ‘गार्डीयन’नं दिलं आहे. काझीन्स्की यांनी हा विचित्र दावा करताना, “महिलांनी केवळ दोन वर्ष, तर पुरुषांनी सरासरी २० वर्ष जास्त प्रमाणात मद्यपान केलं पाहिजे”, असं म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या अनुभवानुसार आपण हा दावा करत असल्याचं काझीन्स्की यांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी आपल्या दारुड्या मित्राला बरं केलं, पण त्याचवेळी त्यांना एका महिलेचं व्यसन सोडवता आलं नाही, असा दाखला देत काझीन्स्की यांनी जन्मदराविषयीचा अजब दावा केला आहे. पोलंडमध्ये सध्या प्रत्येक महिलेच्या तुलनेत १.३ असा मुलांचा जन्मदर आहे. हा जन्मदर सरासरीपेक्षा कमी असल्याचं वृत्त ‘गार्डीयन’नं दिलं आहे. आर्थिक स्थैर्य आणि गर्भपाताच्या निर्बंधांमुळे पोलंडमधील महिलांमध्ये मुल होऊ देण्यास आत्मविश्वास नाही, हे संभाव्य कारण असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.