पीटीआय, बीजिंग
भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्षांनिमित्त दोन्ही देशांमध्ये मंगळवारी शुभेच्छांचे आदानप्रदान झाले. भारत-चीन संबंधांचा विकास केवळ जगाच्या समृद्धी आणि स्थिरतेसाठीच नाही तर बहुध्रुवीय जग साकारण्यासाठीही अनुकूल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या पंतप्रधान ली क्विंग यांना लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे. तर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंधांना ड्रॅगन-हत्ती यांच्यातील ‘टँगो’ नृत्याची उपमा दिली. हे या दोन प्राण्यांमधील एक प्रतीकात्मक नृत्य आहे. दोन्ही देशांच्या हितसंबंधांची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांनीही संदेशांचे आदानप्रदान केले. स्थिर, मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांतून दोन्ही देशांना लाभ होईल, असे मुर्मू यांनी नमूद केल्याचे चिनी वृत्तसंस्थेने म्हटले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही सैन्यांत तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संदेश महत्त्वाचे आहेत.
जिनपिंग यांनी मुर्मू यांना पाठविलेल्या संदेशात दोन्ही आधुनिकतेच्या प्रयत्नात महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याचे नमूद केले. त्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ग्यू जियाकून यांनी पत्रकार परिषदेत प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छांच्या आदानप्रदानाबाबत माहिती दिली. द्विपक्षीय संबंधांची ७५ वर्षे ही ऐतिहासिक घटना आहे, असे त्यांनी म्हटले आहे.