नवी दिल्ली/मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला असून शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला. अनेक राज्यांमध्ये तिरंगा यात्रा आणि प्रभात फेऱ्या काढून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. त्यांत राजकीय नेत्यांनी, समाजसेवकांनी, विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देशभर उत्साहरंग उसळला असून देशाच्या अनेक भागांचा आसंमत तिरंगी रंगांत न्हाऊन निघाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीयमंत्री, भाजपचे नेते, भाजपच्या मित्र पक्षांचे नेते यांनी आपआपल्या निवासस्थांनावर शनिवारी राष्ट्रध्वज फडकावला, तर भाजपचे अनेक नेते तिरंगा यात्रांमध्ये सहभागी झाले. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या दिल्लीतील घरावर शनिवारी राष्ट्रध्वज फडकावला. तिरंगा हा आमचा अभिमान आहे. तो देशवासीयांना एकत्र आणतो आणि प्रेरणा देत राहतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी तिरंगा फडकवला आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या शूरांना आदरांजली वाहिली, असे शहा यांनी एका संदेशात म्हटले आहे.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला आणि त्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केली. भाजपने फाळणीच्या भयावह आठवणींवर आधारित शनिवारी आपल्या कार्यालयात एक प्रदर्शनही भरवले होते. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे स्वातंत्र्यसैनिक चिट्टू पांडे यांना आदरांजली वाहिली. पक्षाचे देशभरातील नेते ‘प्रभात फेरी’ आणि तिरंगा यात्रांमध्ये सहभागी झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जोधपूरमध्ये मुघलांविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध योद्धे दुर्गादास राठोड यांच्या पुतळय़ाचे अनावरण केले. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी शनिवारी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात ‘प्रभात फेरी’ काढली. गळय़ात भगवा गमछा बांधून, जयशंकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मतदारसंघ असलेल्या कनकपुरा तालुक्यातील हरोहळ्ळी गावात प्रभात फेरी काढली.

मोदींच्या मातोश्री हिराबांचे ध्वजवितरण

गेल्या जूनमध्ये वयाच्या शंभरीत प्रवेश केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांनी शनिवारी गुजरातमधील गांधीनगर शहराच्या उपनगरातील आपल्या निवासस्थानी लहान मुलांना राष्ट्रध्वजाचे वाटप केले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शनिवारी चिल्ड्रेन्स युनिव्हर्सिटी येथे १०० फूट उंच चौथऱ्यावर मोठा तिरंगा फडकवून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या मोहिमेअंतर्गत हिराबा यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वजाचे वाटप केले. बडोदा, मेहसाणासह राज्याच्या विविध भागांत आणि जिल्ह्यांत भाजपचे आमदार आणि मंत्र्यांनी तिरंगा यात्रा काढली.

दिल्लीकरांना २५ लाख राष्ट्रध्वज

तिरंगा हा देशाचा सन्मान आणि गौरव असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासीयांना घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राजधानीच्या कानाकोपऱ्यात शाळकरी विद्यार्थी आणि लोकांना २५ लाख राष्ट्रध्वजांचे वाटप करण्याचा आणि देशभक्तीपर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) शनिवारी २३ स्थानकांवर राष्ट्रध्वज फडकावून मोहीमेची सुरुवात केली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजभवन कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रध्वजाचे वाटप करून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला सुरुवात केली. राज्यपालांनी शहिदांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.

सुपरस्टार रजनीकांतचा सहभाग

तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी, तमिळ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांच्यासह अनेक राजकीय नेते ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सामील झाले. शहर-खेडय़ांतील नागरिकांनीही आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकवला. राज्यपाल रवी यांनी राजभवन येथे विद्यार्थ्यांना ध्वजवाटप केले. स्वातंत्र्यसैनिक, शहीद आणि राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्याचे आवाहन रजनीकांत यांनी केले.

नक्षलग्रस्त भागांत तिरंगा 

रायपूर : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील दुर्गम ठिकाणी राष्ट्रध्वजाचे वितरण केले. माओवाद्यांच्या दहशतीमुळे ज्या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर कधीही राष्ट्रध्वज फडकावला गेला नाही, अशा गावांमध्येही ध्वजवितरण करण्यात आल्याचे ‘सीआरपीएफ’च्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. गेल्या एका आठवडय़ात दंतेवाडा, विजापूर, बस्तर आणि सुकमा जिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये सीआरपीएफ जवानांनी एक लाख राष्ट्रध्वज वितरित केले असून आदिवासींना ते आपल्या घरांवर फडकावण्यास सांगितले आहेत. सीआरपीएफच्या ३८ बटालियन बस्तरमध्ये तैनात आहेत.

राज्यभरात..

‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेला शनिवारपासून महाराष्ट्रात सर्वत्र सुरूवात झाली. या अभियानासाठी मुंबई महापालिकेने ४१ लाख राष्ट्रध्वज मुंबईकरांना घरपोच दिले आहेत. रहिवाशांनी खिडक्या, सज्जांमध्ये राष्ट्रध्वज फडकावले आहेत. मुंबईतील २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई केली आहे. त्यांत पालिकेच्या इमारती, राज्य सरकारी इमारती, खासगी इमारतींचा समावेश आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातील सलग २८ इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. त्यात निवासी इमारतींबरोबरच तारांकित हॉटेल आणि व्यावसायिक इमारतींचाही समावेश आहे. मुंबईतील हे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे.

या परिसरातील वृक्ष, विजेचे खांब, पुतळे यांनाही तिरंग्याच्या रंगांत सजवण्यात आहे. काही ठिकाणी लेझर शो देखील करण्यात येणार आहे. जुहू चौपाटीवरही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी अभियानाची माहिती देणारे साडेचार हजार फलक, सुमारे १०० डिजिटल फलक, ३५० बसथांब्यांवर जाहिराती प्रदर्शित केल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी सांगितिक उद्घोषणा करण्यात येत आहेत. चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची चित्रफित दाखविण्यात येत आहे.

उद्याने, सभागृहांमध्येही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस तिरंगा पदयात्रा, पथनाटय़, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

संघाच्याही समाजमाध्यम खात्यांवर तिरंगा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारीच आपल्या समाजमाध्यम खात्यांचे भगव्या ध्वजाचे पारंपरिक ‘प्रोफाइल चित्र’ बदलून तेथे राष्ट्रीय ध्वज तिरंगा झळकावला. २ ते १५ ऑगस्ट दरम्यान समाजमाध्यम खात्यांचे ‘प्रोफाइल चित्र’ बदलून ते तिरंगा ध्वज ठेवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले होते. त्याला प्रतिसाद देत अनेक संस्थांनी आणि नागरिकांनी ‘प्रोफाइल चित्र’ बदलले. परंतु भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र आपल्या समाजमाध्यम खात्यांवरील भगव्याचे चित्र शुक्रवापर्यंत बदलले नव्हते. त्यावरून समाजमाध्यमांवर बऱ्याच टीकाटिप्पण्या सुरू होत्या.

चंडीगडमध्ये विश्वविक्रमी ‘मानवी तिरंगा’

चंडीगड : संयुक्त अरब अमिरातीतील एका संस्थेने केलेला यापूर्वीचा विक्रम मोडीत काढत चंडीगड विद्यापीठाने शनिवारी जगातील सर्वात मोठा मानवी ध्वज उभारला. या विक्रमाची नोंद ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. विद्यापीठ, एनआयडी फाऊंडेशनचे स्वयंसेवक, मान्यवर, शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे ५८८५ विद्यार्थी या मानवी तिरंगा उभारणीत सहभागी झाले होते.

चैतन्याचे वातावरण..

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रध्वजाच्या तीन रंगात रंगला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मुंबई महापालिका मुख्यालयासह अनेक इमारती तिरंगी रोषणाईत उजळून निघाल्या आहेत. मुंबई महापालिकेने सुमारे ४१ लाख राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी घरोघर राष्ट्रध्वजांचे मोफत वितरण केले आहे. मोठय़ा शहरांमधील सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांवर तिरंगा फडकताना दिसत आहे.

मुंबईत काय?

दक्षिण मुंबईतील सरकारी इमारती, पुरातन इमारती आणि निवासी इमारतींवरही तिरंगी रोषणाई करण्यात आल्यामुळे शनिवारपासून हा संपूर्ण परिसर तीन रंगात न्हाऊन निघत आहे. तिरंगी रोषणाईची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी पर्यटकांनी शनिवारी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दीही केली होती. ठाणे-नवी मुंबई आणि इतर उपनगरांतही घराघरांवर राष्ट्रध्वज उभारले जात होते. समाजमाध्यमांत त्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली जात होती.

अल्पावधीत २५ कोटी विक्रमी ध्वजनिर्मिती

‘हर घर तिरंगा’ या मोहिमेअंतर्गत देशात अल्पावधीत विक्रमी ध्वजनिर्मिती झाली. यातून कापड उद्योगाला मोठा आर्थिक दिलासा तर मिळालाच परंतु मंदीच्या काळात मोठा रोजगारही उपलब्ध झाला आहे. यापूर्वी ‘पीपीई किट’ उत्पादनात या उद्योगाने मोठी भरारी घेत जगाला भारताची दखल घ्यायला लावली होती. कापड उद्योजकांच्या माहितीनुसार आतापर्यंत देशात सुमारे २५ कोटी तिरंग्यांची निर्मिती केली आहे.