नवी दिल्ली: Delhi Vidhan Sabha Exit Poll 2025 दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाले. मतदानाच्या दिवशीही ‘आप’ व भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत राहिल्याने लढतीतील अटीतटी अधोरेखित झाली. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजामध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले असून १० पैकी ८ चाचण्यांनी भाजप पूर्ण बहुमत मिळवून विजयी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे २७ वर्षांच्या विजनवासानंतर भाजप दिल्लीवर कब्जा करेल का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

तीन मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला दोनतृतीयांशपेक्षाही जास्त जागा म्हणजे ५०-६० जागा मिळू शकतील असे भाकीत केले आहे. दोन चाचण्यांचा अपवाद वगळता इतर अंदाजांनी भाजप बहुमताचा ३६ चा आकडा सहज पार करेल असे सुचित केले आहे. ८ चाचण्यांनी भाजपला ३५ ते ४९ जागा मिळू शकतील असे मानले आहे. ‘पीपल्स पल्स’ संस्थेच्या अंदाजामध्ये भाजपला प्रचंड झुकते माप मिळाले असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाला ७० जागांपैकी तब्बल ५१ ते ६० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

सलग तीन वेळा दिल्ली जिंकणाऱ्या ‘आप’ला १८ ते ३२ जागा मिळू शकतात असा या विविध अंदाजांचा कयास आहे. ‘माइंड ब्रिंक’ या संस्थेच्या अंदाजानुसार मात्र ‘आप’ चौथ्यांदा सत्ता राखू शकेल असा आशावाद व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ‘आप’ला ४४-४९ तर भाजपला २१-२५ जागा मिळू शकतील. इथेही ‘आप’च्या १३-१७ जागा कमी होत असल्याचे दिसते. ‘वीप्रिसाइड’ या संस्थेने ‘आप’ला ४६-५२ जागा दिल्या आहेत. बाकीच्या अंदाजांमध्ये ‘आप’च्या जागांमध्ये प्रचंड घसरण होणार असल्याचे दर्शवले आहे. २०१५ व २०२० मध्ये ‘आप’ला अनुक्रमे ६७ व ६२ जागा व ५४ टक्के मते मिळाली होती. हे अंदाज खरे ठरले तर ‘आप’च्या जागांबरोबर मतांच्या टक्केवारीतही मोठी घसरण झालेली असू शकेल.

काँग्रेसची पुन्हा निराशा?

दिल्लीतील तिरंगी लढतीत काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपयश येण्याची शक्यता असून मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार काँग्रेसला कदाचित एकही जागा मिळणार नाही. काँग्रेसने खाते उघडलेच तर जास्तीत जास्त ३ जागांवर समाधान मानावे लागेल.

‘वीप्रीसाइड’ने ‘आप’ला सर्वाधिक ५२ जागा तर भाजपला सर्वात कमी १८ जागा दिल्या आहेत. ‘पीपल्स प्लस’ने भाजपला सर्वात जास्त ६० तर ‘आप’ला सर्वात कमी १० जागा दिल्या आहेत. १० मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांचा सरासरी जागांचा आकडा ‘आप’साठी २५ ते ३१, भाजपसाठी ३६ ते ४१ तर, काँग्रेससाठी ० ते १ असा आहे.

शनिवारी मतमोजणी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी होणार असून भाजपने दिल्ली जिंकली तर हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्ली हे भाजपला मिळालेले सलग तिसरे जंगी यश असेल. मतदानाच्या चार दिवस आधी, १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची केंद्र सरकारची अर्थसंकल्पातील घोषणा भाजपसाठी विजयी एक्का ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या हाती फारसे काही लागणार नसले तरी, मतांचा टक्का वाढला तर त्याचा लाभही भाजपला झाला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मतदानाच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोप

दिल्लीतील ७० जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. मात्र आप व भाजप यांच्यामध्ये दिवसभर आरोप-प्रत्यारोप होत राहिले. सीलमपूर या मुस्लीमबहुल मतदारसंघामध्ये बुरख्या खालून बनावट मतदारांनी मतदान केल्याच्या आरोपामुळे गोंधळ निर्माण झाला होता. आपचे मनीष सिसोदिया लढत असलेल्या जंगपुरा मतदारसंघामध्येही आप व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ग्रेटर कैलाश मतदारसंघातील आपचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांनी, मतदारांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप पोलिसांवर केला. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी मतदान होत असताना पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसने केला.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे मतदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब मतदान केले. केंद्रीयमंत्री एस. जयशंकर, हरदीप पुरी यांच्यासह काँग्रेसचे नेते सोनिया, राहुल व प्रियंका गांधी-वढेरा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी

० आपः २५-३१

० भाजपः ३६-४१

० काँग्रेसः०-१

मॅट्राईज-                     आप ३२-३७          भाजप ३५-४०                     काँग्रेस ०-१

जेव्हीसी पोल              आप २२-३१           भाजप ३९-४५                     काँग्रेस ०-२

पीपल्स पल्स-कॉँडेमा   आप १०-१९           भाजप ५१-६०                     काँग्रेस ०

पीपल्स इनसाइट        आप २५-२९          भाजप ४०-४४                      काँग्रेस ०-१

पी-मार्ग                       आप २१-३१          भाजप ३९-४९                     काँग्रेस ०-१

माइंड ब्रिंक               आप ४४-४९,          भाजप २१-२५                      —

वीप्रिसाइड                आप ४६-५२           भाजप १८-२३                    काँग्रेस  ०-२

Story img Loader