झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती राहून पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
झारखंड आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांमध्ये पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडल्यानंतर घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत इंडिया टीव्ही-सी व्होटरने ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत भाजप व त्याचा मित्रपक्ष एजेएसयू यांना ३७ ते ४५ जागा मिळतील, असे म्हटले आहे. तर टुडेज चाणक्यने भाजप हा ६१ जागांसह संपूर्ण बहुमत मिळवेल, असे म्हटले आहे.
८७ सदस्यांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत मात्र भाजप त्याचे ‘मिशन ४४’चे उद्दिष्ट गाठू शकणार नाही, असे मतदानोत्तर चाचण्यांवरून दिसते. इंडिया टीव्हीच्या मते, भाजपला २७ ते ३३ जागा मिळतील आणि त्यापैकी बहुतांश, म्हणजे २५ ते ३१ जागा जम्मू भागातून असतील. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स या निवडणुकीत ८ ते १४ जागांच्या खराब कामगिरीसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल. तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीला ३२ ते ३८ जागा मिळतील, असे इंडिया टीव्हीने म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यात पीडीपी भरघोस यश मिळवून ४६ पैकी २९ ते ३५ जागा मिळवेल, असा चाचण्यांचा अंदाज आहे. येथे नॅशनल कॉन्फरन्सला ७ ते १३ जागा, तर काँग्रेसला जास्तीत जास्त २ जागा मिळतील, असेही यात म्हटले आहे.
जम्मूत ६६ टक्के मतदान
जम्मू व काश्मीर विधानसभेसाठी पाचव्या व शेवटच्या टप्प्यात २० जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले. गेल्या वेळीपेक्षा चार टक्के अधिक मतदान झाले. जम्मू व काश्मीर विधानसभा निवडणुकीत गेल्या २५ वर्षांत या वेळी सर्वाधिक मतदान झाले आहे. हे ऐतिहासिक व अभूतपूर्व असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.जम्मू व काश्मीरमध्ये २००२ मध्ये केवळ ४३ टक्के मतदान झाले होते. तर २००८ मध्ये ६१ टक्के मतदान झाले होते.
झारखंडमध्ये ६६ टक्के मतदान
झारखंडमध्ये शेवटच्या व पाचव्या टप्प्यात १६ जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले. शांततेत मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पी. के. जाजोरिया यांनी स्पष्ट केले. मतमोजणी २३ डिसेंबरला होणार आहे.
झारखंड (८१)
इंडिया टीव्ही-सी व्होटर
*भाजप ३७-४५
*झामुमो १५-२३
*काँग्रेस ३-७
टुडेज चाणक्य
*भाजप ६१
*झामुमो १२
*काँग्रेस व इतर ८
एबीपी-नेल्सन
*भाजप व मित्रपक्ष ५२
*काँग्रेस ९
*झारखंड मुक्ती मोर्चा १०
*जेव्हीएम व इतर १०
जम्मू-काश्मीर (८७)
इंडिया टीव्ही-सी व्होटर
*पीडीपी ३२-३८
*भाजप २७-३३
*नॅकाँ ८-१४
*काँग्रेस ४-१०
*इतर २-९