झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, तर जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती राहून पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
झारखंड आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांमध्ये पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडल्यानंतर घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत इंडिया टीव्ही-सी व्होटरने ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत भाजप व त्याचा मित्रपक्ष एजेएसयू यांना ३७ ते ४५ जागा मिळतील, असे म्हटले आहे. तर टुडेज चाणक्यने भाजप हा ६१ जागांसह संपूर्ण बहुमत मिळवेल, असे म्हटले आहे.
८७ सदस्यांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत मात्र भाजप त्याचे ‘मिशन ४४’चे उद्दिष्ट गाठू शकणार नाही, असे मतदानोत्तर चाचण्यांवरून दिसते. इंडिया टीव्हीच्या मते, भाजपला २७ ते ३३ जागा मिळतील आणि त्यापैकी बहुतांश, म्हणजे २५ ते ३१ जागा जम्मू भागातून असतील. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स या निवडणुकीत ८ ते १४ जागांच्या खराब कामगिरीसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल. तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीला ३२ ते ३८ जागा मिळतील, असे इंडिया टीव्हीने म्हटले आहे.
काश्मीर खोऱ्यात पीडीपी भरघोस यश मिळवून ४६ पैकी २९ ते ३५ जागा मिळवेल, असा चाचण्यांचा अंदाज आहे. येथे नॅशनल कॉन्फरन्सला ७ ते १३ जागा, तर काँग्रेसला जास्तीत जास्त २ जागा मिळतील, असेही यात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा