ईशान्य भारतातील तीन राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २७ फेब्रुवारी) मतदान पार पडले. तर त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झाले आहे. मेघालय, नागालँडसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत. भाजपा त्रिपुरातील सत्ता टिकवून ठेवले, तर नागालँडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसह (NDPP) पुन्हा सत्तेत येईल. तसेच मेघालय राज्यात देखील भाजपाच्या जागांमध्ये काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. मात्र तरीहगी मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झिट पोल) माध्यमातून व्यक्त होत आहे.

सोमवारी मेघालय आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले. मेघालयमध्ये अंदाजे ७५ टक्के तर नागालँडमध्ये ७३ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले मतदानोत्तर चाचणी अहवाल जाहीर झाले. त्रिपुरामध्ये २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने ३६ जागा मिळवल्या होत्या. यावेळी टिप्रा मोथा पक्षाचा त्रिपुरामध्ये प्रभाव दिसून आलेला आहे. भाजपा यंदा ३२ जागा जिंकून सत्ता राखू शकते, अशी शक्यता आहे. त्रिपुरातील शाही परिवारातून येणारे प्रद्योत देवबर्मा यांचा टिप्रा मोथा पक्षाला १३ जागा मिळतील. टिप्रा मोथा हे त्रिपुरामधील किंगमेकर ठरतील असे मतदानाआधी बोलले जात होते. सीपीआय (एम) ने यंदा पहिल्यांदाच काँग्रेससोबत हातमिळवणी करुन निवडणूक लढली त्यांना १५ जागांवर समाधान मानावे लागेल, असे दिसत आहे.

त्रिपुरा

इंडिया-टुडेतर्फे घेण्यात येणाऱ्या अ‍ॅक्सिस माय इंडिया पोलने त्रिपुरातील ६० जागांपैकी भाजपला ३६ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. ईटीजी रिसर्च – टाईम्स नाऊ या संस्थेने भाजपाला २१ ते २७ जागा मिळतील, असे सांगितले आहे. त्रिपुराचे निकाल भाजपासाठी महत्त्वाचे आहेत. १९९३ ते २०१८ पर्यंत डाव्यांची त्रिपुरावर सलग सत्ता होती. मात्र २०१८ साली भाजपाने आपली विचारधारा त्रिपुरा राज्यात पद्धतशीरपणे पसरवून डाव्यांना धक्का देत बहुमताने सत्ता स्थापन केली.

मेघालय

मेघालय राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असे दिसत आहे. विधानसभेच्या ६० जागा असलेल्या या राज्यात अ‍ॅक्सिस माय इंडियाने नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) ला १८ ते २४, तृणमूल काँग्रेसला ५ -९, भाजपा ४-८, काँग्रेस ६-१२ जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. भाजपा आणि एनपीपी मेघालयमध्ये एकत्र सत्तेत होते. तृणमूल काँग्रेस पक्षात नोव्हेंबर २०२१ रोजी काँग्रेस पक्षाच्या १२ आमदारांनी प्रवेश केला होता. त्यामुळे एका रात्रीत तृणमूल मेघालयमधील विरोधी पक्ष बनला होता. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार तृणमूल काँग्रेसला ११ जागा मिळू शकतात, असे दिसते. काँग्रेस पक्षाला २०१८ च्या निवडणुकीत सर्वाधिक २१ जागा होत्या, मात्र यावेळी केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागेल, असे अंदाज वर्तविले जात आहेत.

नागालँड

नागालँडमध्ये एनडीपीपी आणि भाजापाची युती असल्यामुळे ते ६० पैकी ४२ जागा आरामात जिंकू शकतील असा अंदाज अनेक चाचण्यातून दिसून येत आहे. नागालँडमधील विरोधी पक्षांपेक्षाही प्रचारात एनडीपीपी आणि भाजपा पक्षाने फार मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे मतदानाचे कल त्यानुसारच व्यक्त झाले आहेत. भाजपाने निवडणुकीत २० तर एनडीपीपीने ४० जागा लढविल्या होत्या. इंडिया टुडेच्या चाचणीत एनडीपीपीला २८ ते ३४ तर भाजपला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊने एनडीपीपी ला २७ ते ३३ आणि भाजपाला १२ ते १६ जागांचा अंदाज वर्तविला आहे. काँग्रेसला मात्र एकच जागा आणि एनपीएफ पक्षाला सहा जागा मिळतील असे सांगण्यात येत आहे.

Story img Loader