डागाळलेले नेते मंत्रिमंडळापासून लांबच
कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातून डागाळलेल्या आमदारांना जाणीवपूर्वक लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
सिद्दरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पाच दिवसांनी मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी शनिवारी पार पडला. विधान परिषदेतील एकाही सदस्याला सिद्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळात जागा मिळालेली नाही. मात्र खाण उद्योगातील मातब्बर आणि राज्यसभा सदस्य अनिल लाड, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे माजी कार्याध्यक्ष डी के शिवकुमार, आर रोशन बेग आदी बडय़ा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मात्र अनिल लाड यांचा भाऊ संतोष लाड यांची मात्र मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
राजभवनात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात २८ पैकी २० जणांना कॅबिनेटमंत्री तर आठ जणांना राज्यमंत्रीपदाची गोपनीयतेची शपथ राज्यपाल एच आर भारद्वाज यांनी दिली. या वेळी मुख्यमंत्री सिद्दरामय्या तसेच उपमुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगलेले आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जी परमेश्वर उपस्थित होते.
सिद्दरामय्या यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवासा प्रसाद आणि अभिनेत्याकडून राजकारणाकडे वळलेले एम एच अंबरिश आणि चित्रपट अभिनेत्री उमाश्री आदींचा कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश झाला आहे.
‘नाराज’ समर्थकांची राज्यात निदर्शने
कर्नाटक मंत्रिमंडळात काँग्रेसच्या ज्या नेत्यांना स्थान मिळाले नाही त्यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी शनिवारी आपली नाराजी अनेक ठिकाणी निदर्शने करून व्यक्त केली. यादगीर येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची मोडतोड करून दोन खिडक्यांना आग लावली. ज्येष्ठ नेते ए. बी. मलाका रेड्डी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली नाही, त्याचा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रामनगर आणि मंडय़ा येथेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. मैसूरमध्ये तनवीर सैत यांच्या समर्थकाने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला.