पीटीआय, जोहान्सबर्ग : ‘ब्रिक्स’ गटाच्या राष्ट्रप्रमुखांनी गुरुवारी अर्जेटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या सहा देशांचा ‘ब्रिक्स’मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सहा देशांना पूर्णवेळ सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे. हे सदस्यत्व १ जानेवारी २०२४ पासून अमलात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रिक्स’ शिखर परिषदेचे यजमान आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अखेरच्या दिवशी पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा केली. सहा नवीन देशांच्या समावेशामुळे ब्रिक्स गटाची सदस्य संख्या आता ११ इतकी होणार आहे. सध्या ब्राझील, भारत, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका हे ‘ब्रिक्स’चे पूर्णवेळ सदस्य आहेत. रामाफोसा यांच्याबरोबर या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनॅशियो लुला दा सिल्वा हे उपस्थित होते. ‘ब्रिक्स’च्या विस्ताराबद्दल काही काळापासून चर्चा सुरू होती. विस्तार प्रक्रियेची मार्गदर्शक तत्वे, मानके, निकष आणि कार्यपद्धती यावर या परिषदेत सहमती झाल्याचे रामाफोसा यांनी सांगितले.

तर, बदलत्या काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करायला हवेत हा संदेश ‘ब्रिक्स’चा विस्तार आणि आधुनिकीकरणाने दिला आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्यांनी सांगितले की, ‘भारताने नेहमीच ‘ब्रिक्स’च्या विस्ताराला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नवीन सदस्यांच्या समावेशामुळे एक संस्था म्हणून ‘ब्रिक्स’ अधिक मजबूत होईल असे भारताचे मत आहे’. ‘ब्रिक्स’चा विस्तार ही सहकार्याची नवीन सुरुवात आहे अशी प्रतिक्रिया चीनकडून व्यक्त करण्यात आली. दूरदृश्य पद्धतीने परिषदेत सहभागी झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही या निर्णयाची प्रशंसा केली.

मोदी आणि क्षी यांची संक्षिप्त चर्चा

‘ब्रिक्स’च्या पत्रकार परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यादरम्यान संक्षिप्त चर्चा झाली. मात्र, याबाबतीत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. यापूर्वी दोन्ही नेत्यांदरम्यान मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बाली येथे झालेल्या जी२० शिखर परिषदेच्या वेळी संक्षिप्त भेट झाली होती.

मोदी आणि शेख हसीना यांची भेट

‘ब्रिक्स’ परिषदेला उपस्थित असलेल्या राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ बुधवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीच्या प्रसंगी पंतप्रधान मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट झाली. या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादन केले तसेच एकमेकांच्या स्वास्थ्याची चौकशी केली.

‘ब्रिक्स’च्या विस्तारामुळे अनेक देशांचा बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होईल.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान