पंजाब राज्यातील मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयावर सोमवारी रॉकेटद्वारे ग्रेनेडचा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे मुख्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर अशाप्रकारे हल्ला केल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर मोहाली पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, “सोमवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास सेक्टर ७७, एसएएस नगर येथील पंजाब पोलीस इंटेलिजन्स विंगच्या मुख्यालयात एक किरकोळ स्फोट झाला आहे. यामध्ये कोणतंही मोठं नुकसान झालं नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथकांना देखील पाचारण करण्यात आलं आहे.”
या घटनेमुळे राज्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडेच सीमा सुरक्षा दलाने सीमेपलीकडून ड्रोनद्वारे होणाऱ्या स्फोटकं, शस्त्रे आणि ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश केला होता. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, दोन संशयित आरोपी एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून आले होते. यावेळी त्यांनी गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीपासून सुमारे ८० मीटर अंतरावरून आरपीजीद्वारे ग्रेनेड हल्ला केला आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना घटनास्थळ परिसरात असलेल्या तीन मोबाईल टॉवरमधून सुमारे ७ हजार मोबाईल फोन आढळून आले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलीस महासंचालकांशी बातचित करून घटनेचा आढावा घेतला. या स्फोटात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाई, असं आश्वासन मान यांनी दिलं आहे.