Gujarat Cracker Factory Blast : गुजरात येथील बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीत स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.
जिल्हाधिकारी मिहिर पटेल काय म्हणाले?
१ एप्रिलच्या दिवशी बनासकांठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले. या आगीत अनेक कर्मचारी अडकून पडल्याची भीती आहे. आज सकाळच्या सुमाराला ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली आहे. तसंच या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
गुजरातच्या बनासकंठा या ठिकाणी असलेल्या फटाका फॅक्ट्रीतून मोठे आवाज आले. स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. डिसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितलं की फटाका फॅक्ट्रीत आग लागल्याने सलग स्फोट झाले आणि आगीचा भडका उडाला. स्फोट इतके भीषण होते की छताचा भाग खाली कोसळला. त्या ढिगाऱ्याखालीही लोक अडकल्याची भीती आहे.
जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी सांगितलं की आज सकाळीच ही आगीची घटना घडली. अग्नीशमन विभागाचे अधिकारी या ठिकाणी तातडीने पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. आता मदत आणि बचावकार्य आम्ही करत आहोत असंही त्यांनी सांगितलं.