Terrorism In Pakistan: दहशतवादावरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानवर मिश्कील टिप्पणी करत निशाणा साधला आहे. भारत माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात तज्ज्ञ आहे, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादात, असा टोला एस. जयशंकर यांनी लगावला आहे. “आपण आयटी क्षेत्रात तज्ज्ञ आहोत, तर शेजारचा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवादात. हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण आम्ही जगाला सांगू इच्छितो, दहशतवाद हा दहशतवाद आहे. आज या हत्याराचा वापर आमच्याविरोधात होत आहे. उद्या तुमच्याविरोधात होईल”, असा गंभीर इशारा गुजरातच्या वडोदरामधील एका कार्यक्रमात एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला आहे.

Pakistan Twitter Account Withheld In India: पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटला भारतात स्थगिती

आधीच्या काळापेक्षा दहशतवादाबाबत जगाचा दृष्टीकोन बदलला असून आता हे कृत्य सहन केले जात नाही. दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांवर दबाव वाढला असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. वडोदरातील कार्यक्रमात बोलताना एस. जयशंकर यांनी भारतातील उत्तर-पूर्व भागातील दहशतवादावर भाष्य केले आहे. २०१५ मध्ये बांगलादेशसोबत सीमेसंदर्भात करार करण्यात आल्यानंतर या भागातील दहशतवादी कारवाया कमी झाल्या आहेत. या करारामुळे कट्टरपंथी लोकांना बांगलादेशमध्ये आश्रय मिळणे बंद झाले आहे, असे जयशंकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पाकिस्तानला एफ १६ विमानांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरुन काही दिवसांआधी एस. जयशंकर यांनी अमेरिकेला खडेबोल सुनावले होते. “एकीकडे दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असं सांगायचं आणि दुसरीकडे एफ-१६ सारखी लढाऊ विमानं कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशा गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत नाही आहात,” अशी टीका एस जयशंकर यांनी केली होती. “आम्ही पाकिस्तान आणि भारतासोबत असणाऱ्या संबंधांची तुलना करत नाही. दोघेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमचे भागीदार आहेत,” असे बायडन सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले होते.

Story img Loader