पीटीआय, इस्लामाबाद
‘सीमापार सुरू असलेला दहशतवाद, अतिरेकीवाद आणि फुटीरतावाद या तीन दुष्टशक्तींच्या कागाळ्या या व्यापार, ऊर्जा, संपर्क यंत्रणेला चालना देऊ शकत नाहीत, प्रादेशिक सहकार्यामध्ये त्या बाधा तयार करतात’, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरूनच पाकिस्तानला अप्रत्यक्षरीत्या सुनावले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत ते बोलत होते. शरीफ यांनी २३व्या ‘एससीओ’ बैठकीला उद्घाटनपर संबोधन केल्यानंतर जयशंकर यांचे भाषण झाले. ‘एससीओ’च्या सनदेतील परस्पर आदराचा उल्लेख त्यांनी वारंवार नमूद केला. पाकिस्तान आणि चीनचा थेट नामोल्लेख टाळून जयशंकर म्हणाले, की परस्पर आदर आणि एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान राखला, तरच एकमेकांशी सहकार्य होईल. परस्पर विश्वासाने ‘एससीओ’ गटाने काम केले, तर त्याचा सदस्य देशांना मोठा फायदा होईल. परस्परांच्या प्रामाणिक सहकार्यावर आधारित हे व्हायला हवे. स्वत:चाच एकट्याचा अजेंडा ठेवून पुढे जाणारे नको, असेही जयशंकर यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>चीनच्या प्रकल्पांचेच पाककडून गोडवे; ‘वन बेल्ट वन रोड’बाबत संकुचित दृष्टी नको, शरीफ यांच्याकडून आगपाखड
‘वन बेल्ट वन रोड’ला विरोधच !
चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भारताने बुधवारी पुन्हा विरोध केला. असा विरोध करणारा ‘एससीओ’ गटातील भारत हा एकमेव देश आहे. ‘एससीओ’च्या बैठकीनंतर संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले. चीनच्या या उपक्रमाला रशिया, बेलारुस, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी पाठिंबा दिल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. या प्रकल्पातील चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताचा प्रकल्पाला पहिल्यापासून विरोध आहे.
‘एससीओ’ची सनद पाळण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत, त्यावर आपली प्रगती अवलंबून आहे. विकास आणि वाढीला शांतता आणि स्थिरता आवश्यक असते. चांगला शेजार कुठे तरी हरवल्यासारखे वाटत असेल आणि कुठे तरी अविश्वासाची भावना असेल, तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.-एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री