मुंबई : मणिपूरमधील प्रश्न जुने व गुंतागुंतीचे आहेत, हे खरे आहे. पण मणिपूरप्रश्नी भारताची प्रतिमा जगासमोर मलिन करण्याची राजकीय भूमिका (अजेंडा) योग्य नाही. मणिपूरवरून राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे परखड प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले.
जागतिक उद्याोगक्षेत्राबरोबरच, जगभरातील नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उजळली असून जागतिक उद्याोगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. त्यासाठी अन्य पुराव्याची गरज नाही, असे ते म्हणाले. मुंबई भाजप कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Bengaluru Man Post : बंगळुरुतील माणसाच्या कूककडे आहे स्वतःचा स्वयंपाकी, सोशल मीडियावर ‘या’ चर्चांना उधाण
s
गुंतवणुकीबाबत राज्यांनी धोरण आखावे
भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या राज्यांत १२ विभाग जाहीर करण्यात आले आहेत. त्यांचे स्थान, आकार, वैशिष्ट्ये वेगळी आहेत, त्यामुळे राज्यांनी धोरण निश्चित करावे, अशी अपेक्षाही एस. जयशंकर यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारांची भागीदारी सकारात्मक असावी, त्यावरच या योजनेचे यश अवलंबून आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी जयशंकर म्हणाले की, शेजारी राष्ट्रांतील घटनांबाबतही आपण सतर्क असून जगातील तणावपूर्ण परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वाची ठरत आहे.
पीएलए कार्यकर्त्यांना अटक
इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात बंदी घातलेल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) च्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. एन प्रियो सिंग आणि एस देवजीत सिंग अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान सुरक्षा दलांनी चुराचंदपूर आणि थौबल जिल्ह्यातून शस्त्रसाठाही जप्त केला.
विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राला महत्त्वाची भौगोलिक अनुकूलता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आदर्श राज्य आहे. जर्मनीतील अनेक उद्याोगांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. – एस. जयशंकर, परराष्ट्र व्यवहारमंत्री
घुसखोरीसाठी २०१४ पूर्वीची परिस्थिती नाही
गेल्या दशकभरात देशाच्या सीमाभागात मोठे परिवर्तन झाले असून सीमेवर कुंपण बांधण्यात प्रगती झाल्याने पूर्वीएवढी घुसखोरी आता होत नाही, असा दावाही जयशंकर यांनी केला. मोदी सरकार देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न करीत राहील. जेथे कुंपण घालणे गरजेचे आहे, तेथे कुंपणही घातले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणीही कसेही घुसावे, ही २०१४ पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.