पॅरिस आतिरेकी हल्ल्याच्या सूत्रधारांविरोधातील कारवाईदरम्यान मारली गेलेली आत्मघातकी महिला दहशतवादी २६ वर्षीय हसना धर्मावर विश्वास ठेवणारी नव्हती. तिला दारूचे व्यसन होते, तसेच पार्ट्या करायलादेखील तिला आवडायचे, असा खुलासा ब्रिटनच्या ‘डेली मेल’ वृत्तपत्राने केला आहे. वृत्तपत्राने तिची अनेक छायाचित्रेदेखील प्रसिद्ध केली आहेत. पार्ट्याची आवड असलेली हसना आपल्या मित्रांमध्ये ‘काऊगर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती.
पॅरिस हल्लाच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी बुधवारी सेंट डेनिसमधील एका अपार्टमेंटमध्ये दाखल झालेल्या पोलिसांनी हसनाला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, तिने अंगावरील स्फोटकांचा स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. स्वत:ला उडवून देण्याआधी तिने पोलिसांवर खूप आरडाओरड केल्याचे सांगितले जाते. हसनाबरोबर पॅरिस हल्लाचा सूत्रधार अब्देल हामिद अबौददेखील मारला गेला.

एक महिन्यापूर्वीच बुरखा परिधान करायला सुरुवात केलेली हसना कुराण पठण करत नसल्याचे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे. आपल्याच दुनियेत रमणारी हसना सतत फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर कार्यरत असायची. पार्टी करण्याबरोबर तिला दारू आणि सिगारेटचे व्यसनदेखील होते. डोक्यावर काऊबॉय प्रकारातील टोपी परिधान करत असल्याने हसना मित्रांमध्ये ‘काऊगर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. तिला मेकअपचीदेखील आवड होती. हसनाने तीन आठवड्यांपूर्वी एका मित्राबरोबर राहण्यासाठी घर सोडल्याची माहिती तिचा भाऊ युसूफ याचा हवाला देत सदर वृत्तपत्राने दिली आहे. हसना आत्मघातकी दहशतवादी कशी बनली, हे अद्याप कळू शकलेले नाही. १९७३ साली मोरक्कोवरून हसनाचे कुटुंबीय फ्रान्सला आल्याचे बोलले जाते.
