पीटीआय, वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या निकी हॅले यांनी स्वपक्षाच्या दोन माजी राष्ट्राध्यक्षांना टीकेचे लक्ष्य केले आहे. जॉर्ज बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकीर्दीत भरमसाट खर्च झाल्याने देशावरील कर्जात १० ट्रिलियन डॉलरची भर पडली, असे त्यांनी म्हटले आहे.
हॅले यांनी विद्यमान अध्यक्ष जो बायडेन (डेमोक्रॅटिक पक्ष) यांच्यावरही विक्रमी खर्च केल्याचा आरोप केला असून त्यामुळे येत्या दहा वर्षांत देशावरील कर्जाचा बोजा २० ट्रिलियन डॉलरने वाढणार असल्याचा दावा केला आहे. आपण २०१० मध्ये उत्तर कॅरोलिनाच्या निर्वाचित गव्हर्नर असताना देशावरील कर्जाचा भार १३ ट्रिलियन डॉलर होता, असे हॅले यांनी निदर्शनास आणले आहे. त्या म्हणाल्या की, कर्जाचा हा डोंगर ३० वर्षांनी आता ३१ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाला आहे.
हॅले यांनी स्वपक्षातील बुश आणि ट्रम्प यांच्यावर टीका करताना त्यांचे नाव मात्र घेतले नाही. पुराणमतवादी देणगीदारांचा गट असलेल्या क्लब फॉर ग्रोथच्या मियामीमधील (फ्लोरिडा) खासगी सभेत शनिवारी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जसा बेसुमार खर्च करतात, तशीच उधळपट्टी करण्यास अनेक रिपब्लिकन नेत्यांनाही आवडते. रिपब्लिकन पक्षाच्या शेवटच्या दोन राष्ट्राध्यक्षांनी देशावरील कर्जात १० ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक भर घातली आहे. या दोन राष्ट्राध्यक्षांच्या काळातच एकतृतियांश कर्ज झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेला वाचविण्यासाठी, समाजवाद रोखण्यासाठी आणि भांडवलशाहीबद्दलचा आदर कायम राखण्यासाठी मी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत उतरले आहे. समाजवादी डावे हे आर्थिक स्वातंत्र्याचा तिरस्कार करतात. पण तसाच तिरस्कार आमचे काही रिपब्लिकन मित्रही करतात. देशाच्या स्थिरतेसाठी मजबुत अर्थव्यवस्थेची गरज आहे.