EY Employee Death Father Reaction : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या एका सीए तरुणीचा कामाच्या अतितणावामुळे मृत्यू झाल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या तरुणीचे नाव ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे होते. तरुणीचा कामाच्या अतितणावामुळे मृत्यू झाल्याच्या दाव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित कंपनीवर आणि कंपनीच्या प्रमुखांवर अनेक आरोप होत आहेत. आता कामाच्या अतितणावामुळे मृत्यू झालेल्या ॲना सेबास्टियन या तरुणीच्या वडिलांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. ॲना सेबास्टियन कंपनीतील मॅनेजर क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाच्या वेळेत बदल करायचे त्यामुळे माझ्या मुलीला काम पूर्ण करण्यासाठी तासंतास बसून जास्त काम करावं लागायचं”, असा आरोप सिबी जोसेफ यांनी केला आहे.

ॲनाचे वडिलांनी काय आरोप केला?

ॲना सेबास्टियन या तरुणीच्या वडिलांनी कंपनीवर गंभीर आरोप करताना आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया देताना सिबी जोसेफ यांनी म्हटलं की, “मी तिला अनेकदा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. मात्र, आपला हा पहिला जॉब आहे, असं तिला वाटत होतं. तिला वाटायचं की या कंपनीत तिला खूप काही शिकता येईल. ती रात्री उशिरापर्यंत काम करायची. एवढंच नाही तर तिला जास्त कामही करावं लागत होतं. खरं तर अनेकवेळा काम करत असताना तिला जेवायला आणि झोपायला वेळ मिळत नव्हता. तिच्या मॅनेजरला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे तो क्रिकेटच्या सामन्यानुसार कामाच्या वेळेत बदल करत असे. त्यामुळे माझ्या मुलीला नेमून दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी तासंतास बसून काम करावं लागत होतं. या सर्व तणावामुळे २० जुलै रोजी तिच्या खोलीत बेशुद्ध पडली आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला”, असा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा : EY Exposed : “त्रास देऊन मला राजीनामा द्यायला लावला”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले, “कर्माची फळे…!”

ॲनाचा मृत्यू कसा झाला?

अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. तिची आई अनिता ऑगस्टिन यांनी याबाबत एक सविस्तर ई-मेल ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पाठविला होता. तो समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यात ॲनाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचबरोबर ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. सोशल मीडियावर ही बाब पसरल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक नेटिझन्सने कंपनीविरोधात कायदेशीर लढा देण्याचे सूचित केले आहे.