‘अॅपल’ या मोबाईल उत्पादन कंपनीने आपला बहुचर्चित ‘आयफोन ५ एस’ हा मॉडेल ‘टच आयडी’ सुविधेसह दाखल केल्यानंतर प्रतिस्पर्धी सॅमसंग कंपनीनेही तंत्रज्ञानाच्या या लढाईत पुढचे पाऊल टाकत आपल्या आगामी ‘सॅमसंग गॅलेक्सी एस ५’ मध्ये ‘आय स्कॅनर’ बसविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
आयफोन ५ एस मधील सुविधेनुसार, ‘टच आयडी’ म्हणजे फोनधारकाच्या हातांचे ठसे मोबाईल पासवर्डसाठी वापरले जाऊ शकतात. यानुसार मोबाईलच्या मालकाने आपल्या हाताच्या बोटांवरील ठशांचा आयडी दिला तरच फोन सुरू होतो. तर याच्याही पुढे जाऊन सॅमसंगने ‘आय स्कॅनर’ म्हणजेच डोळ्याच्या नजरेला पासवर्ड बनविता येईल यावर प्रयत्न सुरु केले आहेत. सॅमसंगचा लवकरच गॅलेक्सी एस ५ हा स्मार्टफोन दाखल होणार आहे. त्यात ही आय स्कॅनर सुविधा उपलब्ध होणार आहे. हा अत्याधुनिक स्मार्टफोन जानेवारी २०१४ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.