भारतातील आधार कार्ड योजनेत वापरलेल्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या स्कॅनिंग तंत्रावरून एक नवीन बायोमेट्रिक यंत्रणा साकारत असून त्यामुळे आपण संगणकाकडे पाहताना डोळ्यांची हालचाल कशी करतो, यावरून तुमची ओळख संगणक पटवू शकतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या हालचाली हाच तुमचा नवीन पासवर्ड असणार आहे.
सॅन मार्को येथील टेक्सास स्टेट युनिव्हर्सिटीतील संगणक वैज्ञानिक ओलेग कोमोगोरत्सेव यांनी ‘आधार’साठी वापरलेल्या तंत्रापासून प्रेरणा घेऊन हा प्रयोग केला असून दोन व्यक्ती जगाकडे सारख्याच पद्धतीने पाहत नाहीत हे गुणवैशिष्टय़ त्यात हेरले आहे. एखाद्या चित्राकडे वेगवेगळ्या व्यक्ती पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या हालचाली वेगवेगळ्या स्वरूपातील असतात कारण त्यांना चित्रातील वेगवेगळ्या भागात स्वारस्य असू शकते. जरी दोन व्यक्तींनी एकच मार्ग अनुसरला, तरी त्यांच्या डोळ्यांची नेमकी हालचाल ही वेगळी असते, असे लाइव्ह सायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे.
कोमोगोरत्सेव यांनी सांगितले, की डोळ्यांच्या हालचालीतील फरकामुळे त्यात बायोमेट्रिक तंत्रज्ञान वापरता येते. बायोमेट्रिक हे आपल्या शरीरातील कुठल्याही भागाचे मापन असते, त्यात फिंगरप्रिंट म्हणजे बोटांचे ठसे हे लोकांची ओळख पटवण्याचे प्रमुख साधन आहे. संगणक वैज्ञानिकांनी गुन्हे तपासासाठी बायोमेट्रिक तंत्राचा सखोल अभ्यास सुरू केला असून सीमा सुरक्षा व इतर कारणांसाठी त्याचा वापर करता येईल. हे संशोधन प्राथमिक पातळीवर असून त्याचा प्रत्यक्ष विमानतळे व अतिसुरक्षेच्या ठिकाणी वापर होण्यास काही वर्षे लागतील. त्यांच्या मते डोळ्यांच्या बाहुलीचे बायोमेट्रिक स्कॅनिंग हा पुढील सुरक्षा तपासणी यंत्रणांचा महत्त्वाचा भाग असणार आहे. डोळ्याच्या हालचालींचा संवेदक वापरल्यास गुन्हेगारांना बनवेगिरी करता येणार नाही व त्याचा वापर डोळ्यांच्या बाहुलीचे स्कॅनिंग करण्याबरोबर करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा